दोन आमदारांनी साधला तीन तालुक्यांचा बॅलन्स!

By admin | Published: March 15, 2017 10:47 PM2017-03-15T22:47:44+5:302017-03-15T22:47:44+5:30

पदाधिकारी निवडी : सातारा, जावळी, कोरेगाव विधानसभा मतदार संघांना संधी

Two MLAs took control of three talukas! | दोन आमदारांनी साधला तीन तालुक्यांचा बॅलन्स!

दोन आमदारांनी साधला तीन तालुक्यांचा बॅलन्स!

Next



सागर गुजर ल्ल सातारा
आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व आमदार शशिकांत शिंदे यांनी सातारा तालुक्याच्या सभापती व उपसभापतिपद निवडताना तीन तालुक्यांचा बॅलन्स साधल्याचे स्पष्ट दिसते. आगामी विधानसभा निवडणुकीची व्यूहरचना म्हणूनही या निवडीकडे पाहिले जात आहे.
सातारा पंचायत समितीमध्ये २० पैकी ११ जागा जिंकून आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले गटाने निर्विवाद सत्ता मिळविली आहे. भारतीय जनता पक्षाला सोबत घेणाऱ्या खासदार उदयनराजे भोसले यांच्या हाती ९ जागा लागल्या. सभापती व उपसभापतिपद आमदार गटाकडेच जाणार, हे स्पष्ट होते, पण तरीही खासदार गटाने या निवडीत आपले नशीब आजमावले. आमदार गटाची मते फुटू शकली नाहीत, त्यामुळे पर्यायाने आमदार गटाकडेच सभापती व उपसभापतिपद राहिले आहे.
सातारा पंचायत समितीच्या सभापती, उपसभापतिपदासाठी मंगळवारी मतदान झाले. यामध्ये सभापतिपदी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले गटातील मिलिंद कदम तर उपसभापतिपदाची माळ जितेंद्र सावंत यांच्या गळ्यात पडली.
सभापतिपदासाठी राष्ट्रवादीतर्फे खेड गणातून मिलिंद कदम यांनी दोन अर्ज दाखल केले होते. तर शेंद्रे गणातून राष्ट्रवादीच्या छाया कुंभार यांनी एक तर सातारा विकास आघाडीतून दरे खुर्द गणातील हणमंत गुरव यांनी अर्ज दाखल केले. तर उपसभापतिपदासाठी लिंब गणातून जितेंद्र सावंत यांनी राष्ट्रवादीतून दोन अर्ज दाखल केले. तर सातारा विकास आघाडीचे कोडोली गणातील रामदास साळुंखे यांनी अर्ज भरला होता. सभापतिपदासाठी दाखल केलेल्या छाया कुंभार यांनी अर्ज मागे घेतला. त्यामुळे निवडणूक रिंगणात प्रत्येकी दोन अर्ज राहिल्याने मतदान घ्यावे लागले. पंचायत समितीच्या सदस्यांनी हात उंचावून मतदान केले. यामध्ये सभापतिपदासाठी आमदार गटाचे कदम यांना अकरा तर खासदार गटाचे हणमंत गुरव यांना नऊ मते पडली.
सभापतिपदावर कोरेगाव विधानसभा मतदार संघातील मिलिंद कदम यांची निवड झाली असल्याने उपसभापतिवर सातारा-जावळी विधानसभा मतदार संघातील जितेंद्र सावंत यांची निवड केली गेली आहे.
दरम्यान, जिल्हा परिषदेत पाच वर्षे सदस्य असलेले जितेंद्र सावंत यांना लिंब गट आरक्षित झाल्याने पंचायत समितीची निवडणूक लढवावी लागली होती. पंचायत समितीचे सभापतिपदही आरक्षित असल्याने सावंत यांना उपसभापतिपदावर संधी देण्यात आली. हे पद अडीच वर्षांसाठी ठेवले जाणार याची उत्सुकता आहे. सभापतिपद हे अडीच वर्षे कदम यांच्याकडेच राहणार असल्याने उपसभापतिपद बदलाचा निर्णयही अडीच वर्षांनंतरच होऊ शकतो.
आमदारांकडून बेरजेचे राजकारण
लिंब हे सातारा तालुक्यातील मोठे गाव आहे. राजकीयदृष्ट्या या गावाने आमदारांना साथ दिली आहे. भविष्यात हे गाव आपल्या पाठीशी राहील, या बेरजेच्या राजकारणातून लिंबच्या जितेंद्र सावंत यांना उपसभापतिपदावर संधी दिली गेली आहे.

Web Title: Two MLAs took control of three talukas!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.