अट्टल चोरट्याकडून दोन मोबाईल हस्तगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2020 02:56 PM2020-03-12T14:56:46+5:302020-03-12T14:57:38+5:30
सातारा येथील गडकर आळीतील एकाच्या घरातून दोन मोबाईल चोरून नेणाऱ्या अट्टल चोरट्यास शाहूपुरी पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेने अटक केली. त्याच्याकडून चोरीचे मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत.
सातारा : येथील गडकर आळीतील एकाच्या घरातून दोन मोबाईल चोरून नेणाऱ्या अट्टल चोरट्यास शाहूपुरी पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेने अटक केली. त्याच्याकडून चोरीचे मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत.
अजय गोरख गायकवाड (वय २३, रा. नामदेववाडी, झोपडपट्टी, सातारा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी, २५ फेब्रुवारी २०२० रोजी गडकरआळीतील एका घरातून दोन मोबाईल चोरीस गेले होते. त्यानंतर शाहूपुरी पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेने तपास केला असता अट्टल चोरटा अजय गायकवाड याचे नाव निष्पन्न झाले. त्याला पकडण्यासाठी पोलीस घरी जायचे त्यावेळी तो तेथून पसार होत होता.
मंगळवारी रात्री तो पुन्हा घरी आल्याचे समजल्यानंतर पोलिसांनी तत्काळ त्याच्या घरी धाव घेऊन त्याला अटक केली. पोलिसांनी त्याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्याने चोरीचे दोन्हीही मोबाईल पोलिसांकडे सुपूर्द केले.
अजय हा रेकॉर्डवरील असून तो सराईत आहे.
सातारा शहर, शाहूपुरी ठाण्यात त्याच्यावर जबरी चोरी, घरफोडी, मोटारसायकल चोरीचे गुन्हे दाखल आहेत. अजय व त्याच्या टोळीला शाहूपुरी पोलिसांनी यापूर्वी दोन वर्षांसाठी सातारा जिल्ह्यातून तडीपार केले आहे.
सहायक पोलीस निरीक्षक विशाल वायकर, संदीप शितोळे, हसन तडवी, लैलेश फडतरे, अमित माने, स्वप्निल कुंभार, पंकज मोहिते, ओंकार यादव, मोहन पवार, सचिन माने यांनी ही कारवाई केली.