घरकुल फसवणुकीत आणखी दोघे

By admin | Published: February 9, 2015 10:01 PM2015-02-09T22:01:58+5:302015-02-10T00:25:57+5:30

पोलीस पथक रवाना : मुख्य सूत्रधार महिलेचा जबाब नोंदविला

Two more cackle cheats | घरकुल फसवणुकीत आणखी दोघे

घरकुल फसवणुकीत आणखी दोघे

Next

कऱ्हाड : घरकुल मिळवून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याच्या प्रकरणात अन्य एक महिला व पुरुषाचा सहभाग असल्याची माहिती पोलीस तपासात समोर येत आहे. संबंधितांची नावे मुख्य सूत्रधार शुभांगी शेळके हिने पोलिसांना सांगितली असून, त्या दोघांचा पोलिसांकडून कसून शोध घेतला जात आहे. त्यांच्या घरांची झडती घेण्यासाठी शहर पोलिसांचे एक पथक सोमवारी रात्री उशिरा रवाना झाले. ‘रमाई योजनेतून घरकुल घेण्यासाठी एक लाख दहा हजारांचे कर्ज मिळवून देते,’ असे आमिष दाखवून शुभांगी सुरेश शेळके (रा. वाटेगाव) या महिलेने शेकडो महिलांची फसवणूक केल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी उघडकीस आला होता. याप्रकरणी शिल्पा बाळासाहेब जाधव (रा. कोयना वसाहत, मलकापूर, कराड) यांनी कऱ्हाड शहर पोलिसांत फिर्याद दिली होती. शिल्पा जाधव यांच्या फिर्यादीनुसार, १५ फेब्रुवारी २०१४ रोजी शुभांगी शेळके हिने शिवाजी स्टेडियम परिसरात महिलांची बैठक घेतली होती. या बैठकीत तिने रमाई घरकुल योजनेतून घर बांधण्यासाठी प्रत्येकी एक लाख दहा हजार रुपये कर्ज मिळवून देते, असे महिलांना सांगितले होते. त्यासाठी प्रत्येक महिलेने ३ हजार ७७० रुपये भरावे, असेही तिने सांगितले. तिच्या सांगण्यावर विश्वास ठेवून फिर्यादी शिल्पा जाधव यांच्यासह बचत गटातील नीलम जाधव, जयश्री जाधव, हौसाबाई जाधव, कविता जाधव, अश्विनी पवार, सीमा नलवडे यांनी आपली रक्कम शेळकेकडे जमा केली. अशाच प्रकारे शहरातील सुमारे पाचशे महिलांनी तिच्याकडे पैसे दिले. त्यानंतर महिलांनी कर्ज मंजुरीसाठी तगादा लावल्यानंतर सुरुवातीला शेळकेने टोलवाटोलवी केली. दिवाळीदरम्यान तिने महिलांना ‘तुमचे कर्ज मंजूर झाले आहे,’ असे सांगत कर्ज मंजुरीचा धनादेश दाखविला. मात्र, तो धनादेश मिळण्यासाठी प्रत्येक महिलेला आणखी ५५० रुपये भरावे लागतील, असे सांगितले. धनादेश पाहून काही महिलांनी आणखी ५५० रुपये शेळकेकडे जमा केले. मात्र, तरीही तिने महिलांना धनादेश दिला नाही. महिला वारंवार कर्जाची मागणी करू लागल्यावर तिने महिलांना टाळण्यास सुरुवात केली.
फसवणूक झाल्याचे निदर्शनास येताच महिलांनी पोलीस उपाधीक्षक मितेश घट्टे यांची भेट घेतली. घट्टे यांच्या सूचनेनुसार शुभांगी शेळकेवर गुन्हा दाखल करण्यात आला. आठ दिवसांपासून पोलीस शुभांगी शेळकेचा शोध घेत होते. सोमवारी सायंकाळी ती स्वत:हून शहर पोलिसांत हजर झाली. पोलिंसानी चौकशी केली. तिचा जबाब नोंदवून घेतला. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक एच. एन. काकंडकी करीत आहेत. (प्रतिनिधी)

पैसे मिळविले; पण दुसऱ्यांनी नेले !
महिलांकडून गोळा केलेल्या पैशांपैकी सध्या माझ्याकडे काहीही पैसे नसल्याचे शुभांगी शेळके पोलिसांना सांगत आहे. मात्र, पोलिसांकडून तिच्याकडे कसून चौकशी केली जात आहे. महिलांकडून घेतलेले पैसे अन्य काहीजणांनी पळविल्याचेही शेळके पोलिसांना सांगत आहे.

Web Title: Two more cackle cheats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.