प्रतापगडाच्या पायथ्याला आणखी दोन कबरी सापडल्या, इतिहास तज्ज्ञांकडून घेतली जातेय माहिती
By दत्ता यादव | Published: November 12, 2022 02:30 PM2022-11-12T14:30:24+5:302022-11-12T14:30:54+5:30
अफजलखान कबरीजवळील पाडलेले बांधकाम हटविताना प्रशासनाला आज, शनिवारी सकाळी आणखी दोन कबरी त्या ठिकाणी दिसून आल्या
सातारा : प्रतापगडाच्या पायथ्याला अफजल खानाशिवाय आणखी दोन कबरी सापडल्या असून, या कबरी नेमक्या कोणाच्या आहेत. याबाबत महसूल विभाग माहिती घेत आहे.
शिवप्रताप दिनीच जिल्हा प्रशासनाने प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफजलखान कबरीजवळील अतिक्रमण काढून टाकले. चोवीस तासांत ही कारवाई पूर्ण करण्यात आली. पाडलेले बांधकाम हटविताना प्रशासनाला आज, शनिवारी सकाळी आणखी दोन कबरी त्या ठिकाणी दिसून आल्या. या कबरीचे प्रशासनाने फोटो काढले आहेत. कबरीवरील नावे प्रशासनाला समजली असून, इतिहास तज्ज्ञांकडून याची माहिती घेतली जात आहे.
या कबरी कुणाच्या हा सध्या मोठा चर्चेचा विषय बनला आहे. आणखी दोन कबरी असल्याच्या वृत्ताला जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनीही दुजोरा दिला आहे. या कबरी नेमक्या कोणाच्या याबाबत सध्या माहिती घेण्याचं काम महसूल विभागाकडून सुरू आहे.
दरम्यान, अफजल खानाच्या कबरीसमोरील अनाधिकृत बांधकाम पाडावं, अशी मागणी वारंवार शिवप्रेमींकडून केली जात होती. याच पार्श्वभूमीवर २००६ पासून हा परिसर सील करण्यात आला होता.