सातारा जिल्ह्यात आणखी दोन लाल दिवे; राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली
By नितीन काळेल | Published: June 18, 2024 09:17 PM2024-06-18T21:17:51+5:302024-06-18T21:18:22+5:30
राष्ट्रवादीतून मकरंद पाटील, भाजपमधून शिवेंद्रसिंहराजे, जयकुमार दावेदार
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : राज्यमंत्रीमंडळ विस्ताराबाबत हालचाली सुरू असून, पाठीमागे स्वत:हून दूर राहिलेल्या आमदार मकरंद पाटील यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडू शकते, तर भाजपमधूनही आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि जयकुमार गोरे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. सध्या जिल्ह्यात एक मंत्रिपद असले, तरी आणखी दोन मंत्र्यांची भर पडू शकते, असे सध्याचे तरी चित्र आहे.
लोकसभा निवडणुकीत महायुतीला अपेक्षित यश मिळाले नाही. त्यातच ऑक्टोबर महिन्यात विधानसभेची निवडणूक होत आहे. या पार्श्वभूमीवर इच्छुकांची नाराजी दूर करणे आणि महायुतीची ताकद वाढविण्यासाठी मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू झाली आहे. त्यातच पुढील आठवड्यात राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्यापूर्वीच मंत्रीमंडळ विस्तार होऊ शकतो. यासाठी महायुतीतील तिन्ही वरिष्ठ नेत्यांत याबाबत चर्चा सुरू असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात विस्तार होऊ शकतो. भाजप, शिंदेसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाकडूनही अनेकजण इच्छुक आहेत. अनेकांनी फिल्डींग लावण्यास सुरुवात केली आहे.
सातारा जिल्ह्यालाही या मंत्रीमंडळ विस्तारात स्थान मिळू शकते. राष्ट्रवादीकडून वाईचे आमदार मकरंद पाटील हे दावेदार आहेत. एक वर्षापूर्वी अजित पवार महायुतीबरोबर गेल्यावर ९ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मंत्रिपदासाठीचे १० वे नाव हे मकरंद पाटील यांचे होते. पण, त्यावेळी ते स्वत:हून बाजूला राहिले. या विस्तारातही ते दावेदार आहेत. अजित पवार कोणाला ताकद देणार हे लवकरच स्पष्ट होईल, तर भाजपमधून आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि जयकुमार गोरे दावेदार आहेत. आमदार गोरे यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष म्हणूनही काम केले आहे. भाजपमधून दोघांची नावे आघाडीवर असली, तरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोणाला झुकते माप देणार याकडे लक्ष असणार आहे. त्यातच जिल्ह्यात भाजपची ताकद वाढली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी साताऱ्याला आणखी एक मंत्रिपद देऊन पक्षाची ताकद आणखी वाढविण्याचा भाजपचा विचार असणार आहे, तर शिंदेसेनेकडून शंभूराज देसाई मंत्री आहेत. त्यामुळे शिवसेनेकडून कोणाला मंत्रिपद मिळणार नाही हे स्पष्ट आहे.
नवीन मंत्र्यांना तीन महिने मिळणार...
राज्य मंत्रीमंडळाचा विस्तार झाला, तर तो अधिवेशनापूर्वीच होऊ शकतो. तसे झाले, तर नवीन मंत्र्यांना फक्त तीन महिनेच कालावधी मिळू शकतो. कारण, ऑक्टोबर महिन्यात विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्यासाठी सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाही निवडणूक आचारसंहिता लागू शकते, तर अधिवेशनानंतर मंत्रीमंडळ विस्ताराची शक्यता धूसर आहे.
खासदारकी की मंत्रिपद...
लोकसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची वाई येथे सभा झाली होती. त्यावेळी त्यांनी आमदार मकरंद पाटील यांना मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी कसे विनवले होते हे स्पष्ट केलेले, तसेच अजितदादांनी त्यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांना राज्यसभेवर खासदार करण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे मकरंद पाटील यांना मंत्रिपद दिले, तर नितीन पाटील यांना सध्यातरी खासदारकीपासून दूर राहावे लागण्याची शक्यता आहे.