corona virus-साताऱ्यात कोरोनाचे आणखी दोन संशयित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2020 03:03 PM2020-03-19T15:03:42+5:302020-03-19T15:03:49+5:30
सातारा जिल्ह्यात कोरोनाचे संशयित असलेले दोन रुग्ण बुधवारी दुपारी आढळले असून, त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयातील विलगीकरण कक्षामध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या स्वॅपचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.
सातारा : जिल्ह्यात कोरोनाचे संशयित असलेले दोन रुग्ण बुधवारी दुपारी आढळले असून, त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयातील विलगीकरण कक्षामध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या स्वॅपचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.
संबंधित दोन युवक वीस ते पंचवीस वयोगटातील आहेत. एक दुबई तर दुसरा सौदी अरेबिया येथून सातारा जिल्ह्यात आला आहे. गत सहा दिवसांपूर्वी हे दोघे आपापल्या घरी आले. त्यावेळी त्यांना कसल्याही प्रकारचा त्रास जाणवला नाही.
मात्र, बुधवारी दुपारी त्यांना अचानक खोकला, ताप, सर्दीचा त्रास होऊ लागल्यानंतर त्यांनी जिल्हा रुग्णालयातील प्रशासनाशी संपर्क साधला. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पथकाने त्यांना सिव्हिलमध्ये तत्काळ येण्याचा सल्ला दिला. त्यानंतर हे दोघेही युवक जिल्हा शासकीय रुग्णालयातील विलगीकरण कक्षामध्ये दाखल झाले.
त्यांच्या घशाचे नमुने पुणे येथील एन.आय. व्ही. कडे पाठविण्यात आले आहेत. अद्याप या दोघांचा अहवाल प्रशासनाला प्राप्त झाला नसून, अहवाल आल्यानंतर त्यांना कोरोनाची बाधा झाली आहे की नाही, हे समजणार आहे.
दरम्यान, यापूवी दाखल झालेल्या दोघा संशयितांचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना दुसऱ्या दिवशी रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. त्यामध्ये एक तीस वर्षीय युवक आणि सहा वर्षाच्या बालिकेचा समावेश होता.