जिल्हा परिषदेच्या आणखी दोन कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:28 AM2021-05-29T04:28:44+5:302021-05-29T04:28:44+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जिल्ह्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढले असून जिल्हा परिषदे अंतर्गत कार्यरत कर्मचारीही मोठ्या संख्येने बाधित ...

Two more Zilla Parishad employees die due to corona ... | जिल्हा परिषदेच्या आणखी दोन कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू...

जिल्हा परिषदेच्या आणखी दोन कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू...

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : जिल्ह्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढले असून जिल्हा परिषदे अंतर्गत कार्यरत कर्मचारीही मोठ्या संख्येने बाधित होत आहेत. मागील ९ दिवसांत ६० कर्मचारी बाधित झाले आहेत. तर दोघांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेंतर्गत कर्मचारी रुग्णसंख्या १४३२ झाली असून बळींचा आकडा २५ झाला आहे. तर सध्या ४८९ जणांवर उपचार सुरू आहेत.

जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून वर्षाचा काळ लोटला आहे. सुरुवातीच्या पहिल्या लाटेत कोरोनाबाधितांची संख्या कमी होती. मात्र, त्यानंतर विविध गावांबरोबरच शासकीय विभागातही कोरोनाचा शिरकाव झाला. जुलै महिन्यापासून तर जिल्ह्यात कोरोनाचा विस्फोट झाला. याच काळात जिल्हा परिषदेतही कोरोना पोहोचला. त्यानंतर टप्प्याटप्प्याने अनेक विभागांत कोरोनाचा शिरकाव झाला. आतापर्यंत जिल्हा परिषदेतील अर्थ, शिक्षण, रोजगार हमी योजना, बांधकाम, समाजकल्याण, आरोग्य आदी विभागांत कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. कर्मचारी आणि अधिकारीही कोरोनाबाधित होत आहेत.

आतापर्यंत जिल्हा परिषदेच्या एकूण १४३२ कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे यामधील ६० बाधित हे १९ मेनंतर स्पष्ट झाले आहेत. तर दोघां कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाचीही चिंता वाढलेली आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत सातारा तालुक्यात कार्यरत सर्वाधिक २३१ कर्मचारी बाधित झाले आहेत. तर फलटण तालुका १९८, कोरेगाव १८०, कऱ्हाड १७९, खटाव १५८, खंडाळा ६७, जावळी ४१, पाटण ९३, महाबळेश्वर तालुका ५३, माण १२६ आणि वाई तालुक्यात कार्यरत असणाऱ्या १०६ कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर कोरोना बळींचा आकडा २५ वर पोहोचला आहे.

कोरोना विषाणूमुळे खटाव तालुक्यात कार्यरत सर्वाधिक ७ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर सातारा तालुक्यातील चौघांचा तर पाटण आणि फलटण तालुक्यातील तिघांचा तसेच कोरेगाव, जावळी आणि माण तालुक्यातील प्रत्येकी दोन तसेच कऱ्हाड आणि महाबळेश्वर तालुक्यात कार्यरत असणाऱ्या प्रत्येकी एका कर्मचाऱ्याचा कोरोनाने बळी गेला आहे.

चौकट :

९१८ कर्मचाऱ्यांची कोरोनावर मात...

जिल्हा परिषदेच्या १४३२ कर्मचाऱ्यांना आतापर्यंत कोरोना संसर्ग झाला आहे. त्यामधील ९१८ जणांनी कोरोनावर मात केली आहे. यामध्ये कोरेगाव तालुक्यातील १३७ जणांचा समावेश आहे. तसेच सातारा तालुक्यातील १७२, पाटण ८४, कऱ्हाड १३८, महाबळेश्वर ४१, खटाव ७३, वाई ७५, फलटण तालुका ६७, खंडाळा ४७, जावळी २५ आणि माण तालुक्यात कार्यरत असणाऱ्या ५९ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या ४८९ कर्मचाऱ्यांवर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत.

....................................................

Web Title: Two more Zilla Parishad employees die due to corona ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.