सर्वसामान्यांचा प्रवास होणार सुखाचा; सातारा जिल्ह्यातून दोन पॅसेंजर धावू लागल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2021 05:38 PM2021-11-19T17:38:59+5:302021-11-19T17:39:40+5:30
जगदीश कोष्टी सातारा : आशियायी महामार्ग, राष्ट्रीय, राज्य, जिल्हा मार्गाचे जाळे दाट विणले गेले आहे. त्याचप्रमाणे आदर्की परिसरातील डोंगररांगांमधून ...
जगदीश कोष्टी
सातारा : आशियायी महामार्ग, राष्ट्रीय, राज्य, जिल्हा मार्गाचे जाळे दाट विणले गेले आहे. त्याचप्रमाणे आदर्की परिसरातील डोंगररांगांमधून नागमोडी वळणे घेत धावणे रेल्वे लहान लहान गावांतील शेतकरी, विद्यार्थ्यांसाठी स्वस्तात प्रवासाचे भारी साधन होते. मात्र, कोरोनानंतर मार्च २०२० पासून पॅसेंजर बंद झाली अन् अनेक लहान स्थानके लॉकडाऊन झाले. आता पॅसेंजर सुरू झाल्याने या स्थानकांमध्ये वर्दळ वाढली आहे.
सातारा जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव मार्च २०२० मध्ये झाला. तेव्हा कोरोनाचे संक्रमण बाधित लोकांच्या संपर्कात आल्यामुळे होत होते. त्यामुळे केंद्र सरकारने सर्वप्रथम सार्वजनिक प्रवासी वाहतूक बंद करण्याचा निर्णय झाला. जिल्ह्याच्या सीमा बंद केल्या. मात्र, रेल्वे एका राज्यातून दुसऱ्या राज्यात धावते. त्यामुळे तिही बंद करण्यात आली. या वीस महिन्यांत अधूनमधून लॉकडाऊन लागत असल्याने संचारबंदी होती. त्यामुळे प्रवास फारसा घडत नव्हता. पण त्यानंतर एक्स्प्रेस सुरू करण्यात आल्या. पण पॅसेंजरचा तिकीट दर फारच कमी असल्याने त्यात मोठी गर्दी असते. पाय ठेवायलाही जागा नसते. त्यामुळे पॅसेंजरला अजूनही लाल दिवाच दाखविण्यात आला होता.
सातारा-कोल्हापूर, सातारा-पुणे पॅसेंजर सुरू केली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेला प्रवासासाठी जवळच्या शहराच्या ठिकाणी जायचे अन् तेथून एस.टी.ने पुणे, मुंबईला जावे लागत होते. यात वेळ आणि पैसा जास्त वाया जात होता. तो वाचण्यास मदत होणार आहे.
पॅसेंजरमधून प्रवास करण्यासाठी प्रवाशांनी कोरोनाचे दोन्ही डोस घेतलेले असणे गरजेचे आहे.
सध्या सुरू असलेल्या गाड्या
महाराष्ट्र एक्स्प्रेस
गोवा एक्स्प्रेस
मुंबई-कोल्हापूर कोयना एक्स्प्रेस
मुंबई-कोल्हापूर महालक्ष्मी एक्स्प्रेस
हजरत निझामुद्दीन एक्स्प्रेस (आठवड्यातून एकदा)
पूर्णा एक्स्प्रेस (आठवड्यातून एकदा)
जोधपूर फेस्टिव्हल (आठवड्यातून दोनदा)
दादर सेंट्रल चालुक्य एक्स्प्रेस (आठवड्यातून तीनदा)
नवीन पॅसेंजर सुरू
सातारा-पुणे
सातारा-कोल्हापूर
आणखी तीन पॅसेंजर सुरू करण्याची गरज
- कोरोनाचा शिरकाव होण्यापूर्वी सातारा-पुणे पॅसेंजर सकाळी व संध्याकाळी, सातारा-कोल्हापूर पॅसेंजर सकाळी-संध्याकाळी, तसेच पुणे-फलटण ही पॅसेंजर धावत होती. यातील आता सातारा-पुणे सकाळी व सातारा-कोल्हापूर ही एकवेळच धावते. पुणे-फलटण गाडी अजून बंद आहे.
- पॅसेंजरला आजवर सातारकरांमधून मिळत असलेल्या प्रतिसादाचा विचार करून सर्वच्या सर्व गाड्या सुरू करण्याची गरज आहे. त्यामुळे ग्रामीण विद्यार्थी, शेतकऱ्यांना कृषी माल शहरांमध्ये घेऊन जाणे सोपे जाणार आहे.
सातारा जिल्ह्यातून आजवर पॅसेंजर नसल्याने अनेक छोट्या गावातील नागरिकांची गैरसोय होत होती. आता पॅसेंजर सुरू झाल्याने फायदा होणार आहे. मात्र, अजूनही या गाड्यांचे दर एक्स्प्रेसचेच घेतले जातात. हा अन्याय आहे. पॅसेंजरच्या दुप्पट हे दर आहेत. त्यामुळे दरही पूर्वीप्रमाणेच लागू करावेत.- रामदास जगताप, सातारा.