दोन निंबाळकरांचा संघर्ष टोकाला !
By Admin | Published: August 31, 2014 12:17 AM2014-08-31T00:17:17+5:302014-08-31T00:20:31+5:30
फलटण मतदारसंघ : दीपक चव्हाणांच्या विरोधात माने की आगवणे याची उत्सुकता
फलटण : फलटण-कोरेगाव राखीव विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून विद्यमान आ. दीपक चव्हाण यांची उमेदवारी निश्चित मानली जात असतानाच त्यांच्या विरोधात महायुतीतून माजी. आ. बाबूराव माने की दिगंबर आगवणे यांना उमेदवारी मिळणार याची उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहे. सध्या मतदारसंघात दोन निंबाळकरांतील संघर्ष टोकाला गेला आहे. फलटण विधानसभा मतदारसंघावर गेली २० वर्षे राज्य नियोजन मंडळाचे कार्यध्यक्ष रामराजे नाईक-निंबाळकर यांचे एकहाती वर्चस्व आहे. स्वत: रामराजे नाईक-निंबाळकर हे तीनवेळा निवडूण आले आहेत. तर २००९ मध्ये हा मतदारसंघ राखीव झाल्याने राष्ट्रवादीचे दीपक चव्हाण निवडून आले. चारही वेळा मोठ्या मताधिक्याने राष्ट्रवादीने फलटणची मतदारसंघाची जागा मिळविली असली तरी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीला विजयासाठी झगडावे लागणार आहे. कारण तीन महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत विरोधी उमेदवाराने फलटण विधानसभा मतदारसंघातून मताधिक्य घेतल्याने विरोधी गोटात आनंदाचे वातावरण आहे. राष्ट्रवादीकडून विद्यमान आमदार दीपक चव्हाण यांची उमेदवारी निश्चित मानली जात असताना विरोधी गटाकडून माजी आ. बाबूराव माने व दिगंबर आगवणे हे दोनच तुल्यबळावर उमेदवार सध्यातरी रिंगणात दिसत आहेत. महायुतीत हा मतदारसंघ शिवसेनेकडे असला तरी तो आम्हाला सोडावा, अशी मागणी महायुतीमधील स्वाभिमानी पक्ष, रिपब्लिकन पक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष यांनी केली आहे. गत विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढविणारे माजी आ. बाबूराव माने हे पुन्हा इच्छुक असून, त्यांनी संपर्क वाढविला आहे. दुसरीकडे स्वाभिमानीतर्फे दिगंबर आगवणे इच्छुक आहेत. गत दोन वर्षांपासून आगवणे यांनी चांगली तयारी केली आहे. माने व आगवणेबरोबरच अनेकजण महायुतीतून इच्छुक असले तरी प्रामुख्याने ठळक नाव घेण्याइतपत कोणी उमेदवार नाही, सध्यातरी असे चित्र दिसत आहे. (प्रतिनिधी) आरोप-प्रत्यारोपांच्या रोजच फैऱ्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी खुद्द रामराजे नाईक-निंबाळकर यांनी मैदानात उतरून विरोधकांवर तोफा डागण्यास सुरुवात केली आहे. तर त्याच पद्धतीने रणजितसिंह नाईक-निंबाळकर व दिगंबर आगवणे हे त्यांना प्रत्युत्तर देत असल्याने दररोज आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू आहे. बाबूराव माने यांची प्रचार यंत्रणा तोकडी पडताना दिसत असली तरी संथगतीने त्यांचा प्रचार सुरू आहे. एकूणच वातावरण ढवळून निघाले असून, राष्ट्रवादीच्या विरोधात माने की आगवणे यावर पैजा लागल्या आहेत.