सातारा: भरधाव कारने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू, चिंचणीनजीक अपघात
By दत्ता यादव | Published: October 28, 2022 06:47 PM2022-10-28T18:47:31+5:302022-10-28T18:47:59+5:30
ही धडक इतकी भीषण होती की, दुचाकीवरील दोघे काही अंतर हवेत उडून खाली पडले. तर त्यांची दुचाकी रस्त्यातून फरफटत नाल्यात पडली.
सातारा : मेढा-महाबळेश्वर रस्त्यावरील चिंचणी गावाजवळ भरधाव कारने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला. रघुनाथ दत्तात्रय चिकणे (वय ५६, रा. मेढा, ता. जावळी), भरत यदू शेलार (वय ४०, रा, काळोशी, ता. जावळी) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. हा अपघात आज, शुक्रवारी दुपारच्या सुमारास झाला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दत्तात्रय राजाराम देशमुख (रा. कोरेगाव) हे झायलो कारने कोरेगावला निघाले होते. त्यांच्या कारमध्ये त्यांची पत्नी हर्षदा, मुलगा वेदांत, मुलगी प्रियंका आणि सासू कमल कासुर्डे असे पाचजण होते. दत्तात्रय देशमुख हे कार चालवित होते. चिंचणी, ता. सातारा गावच्या हद्दीत ते आल्यानंतर समोरून येणाऱ्या दुचाकीला त्यांच्या कारची जोरदार धडक बसली. ही धडक इतकी भीषण होती की, दुचाकीवरील चिकणे आणि शेलार काही अंतर हवेत उडून खाली पडले. तर त्यांची दुचाकी रस्त्यातून फरफटत नाल्यात पडली.
दोघांच्याही डोक्याला गंभीर जखम झाल्यामुळे मोठ्याप्रमाणात अंतर्गत रक्तस्त्राव झाला. यातच दोघांचाही मृत्यू झाला. तसेच कारमधील चालक दत्तात्रय देशमुख आणि त्यांची दोन्ही मुले, पत्नी, सासू हे सुद्धा गंभीर जखमी झाले. या अपघाताची माहिती मिळताच सातारा तालुका पोलीस आणि रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी पोहोचली. पोलिसांनी जखमींना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले.
जखमींना पुढील उपचारासाठी साताऱ्यातील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांची सांगितले. सातारा तालुका पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद झाली असून, हवालदार मालोजी चव्हाण हे अधिक तपास करीत आहेत.