हिंगणगाव, शेरेचीवाडी परिसरात दोन मोरांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:35 AM2021-01-22T04:35:45+5:302021-01-22T04:35:45+5:30
लोणंद : फलटण तालुक्यातील हिंगणगाव, शेरेचीवाडी परिसरातील शेतात दोन मोरांचा अज्ञात आजाराने मृत्यू झाला. ही घटना समजताच पशुसंवर्धन व ...
लोणंद : फलटण तालुक्यातील हिंगणगाव, शेरेचीवाडी परिसरातील शेतात दोन मोरांचा अज्ञात आजाराने मृत्यू झाला. ही घटना समजताच पशुसंवर्धन व वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी धाव घेऊन मृतदेहाचे नमुने प्रयोगशाळेकडे तपासासाठी पाठविले आहेत.
याबाबत माहिती अशी की, मरिआईचीवाडी (ता. खंडाळा) येथील पन्नास कोंबड्यांचा अचानक मृत्यू झाल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली होती. या कोंबड्यांचा मृत्यू कशाने झाला त्यासाठी त्याचे स्वॅबचे नमुने घेऊन भोपाळ येथे पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने या मृत्यूमुखी पडलेल्या कोंबड्या बर्ड फ्लू या रोगानेच मृत्युमुखी पडल्याचे समजले. त्यानंतर दोन हजार कोंबड्या जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली तयार केलेल्या पथकामार्फत मारून शास्रोक्त पद्धतीने १९ जानेवारीला जमिनीत दफन करून योग्य विल्हेवाट लावली आहे. त्यातच फलटण तालुक्यातील हिंगणगाव व शेरेचीवाडीच्या परिसरात मोहन शंकरराव भोईटे यांचे शेतात दोन मोर मृत्युमुखी पडलेले आहेत. एका मेलेल्या मोरास कुत्र्याने अर्धवट खाल्ले आहे. त्यामुळे परिसरात घबराट वाढली आहे. पशुसंवर्धन अधिकारी व वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी धाव घेऊन हे राष्ट्रीय पक्षी कशामुळे मृत्युमुखी पडले आहेत याची खात्री करण्यासाठी त्यांचे नमुने प्रयोगशाळेत पाठविले आहेत.