साताऱ्यातील स्फोटप्रकरणात बार्शीतील दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2024 01:55 PM2024-10-07T13:55:57+5:302024-10-07T13:56:15+5:30

स्फोटात एकाचा मृत्यू तर चारजण जखमी झाले होते

Two people from Barshi arrested in Satara explosion case | साताऱ्यातील स्फोटप्रकरणात बार्शीतील दोघांना अटक

साताऱ्यातील स्फोटप्रकरणात बार्शीतील दोघांना अटक

सातारा: येथील माची पेठेतील एका दुकानात झालेल्या स्फोटप्रकरणी आणखी दोघांना सातारा शहर पोलिसांनी अटक केली. हे दोघेही बार्शी, जि. सोलापूर येथील रहिवासी आहेत. न्यायालयात त्यांना हजर केले असता ५ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

शोएब अली मणियार (वय ३२), अकिब हमीद पिंजारी (वय ३२, दोघेही रा. बार्शी जि.सोलापूर) अशी अटक केलेल्या संशयित दोघांची नावे आहेत. साताऱ्यातील माची पेठेत बुधवार, दि. २ रोजी दुपारी भीषण स्फोट झाला होता. या स्फोटात मुज्जमील पालकर (वय ४२, रा. गुरुवार पेठ, सातारा) यांचा मृत्यू झाला होता तर चारजण जखमी झाले होते. हा स्फोट फटाक्यांच्या दारूमुळे झाला असल्याचे समोर आले होते. यानंतर पोलिसांनी साताऱ्यातील दोघांना तातडीने अटक केली होती. 

त्यांच्या चाैकशीतून फटाक्यांसाठी लागणारी दारू बार्शीतील दोघा तरुणांनी दिली असल्याचे समोर आले. त्यानंतर सातारा शहर पोलिसांचे पथक बार्शीला गेले. तेथे वरील दोघा संशयितांना त्यांच्या घराच्या परिसरातून अटक केली. पोलिसांनी या दोघांकडे कसून चौकशी केली असता यातील एकाकडे फटाके विक्रीचा परवाना आहे. तर दुसरा मात्र चालक आहे. या दोघांनी मिळून साताऱ्यात स्फोटात मृत्यू झालेल्या मुज्जमील यांना फटाके बनवणारी शोभेची दारू पुरविल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले.

Web Title: Two people from Barshi arrested in Satara explosion case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.