उसाच्या ट्रॉलीला कारची धडक बसून दोघेजण ठार
By admin | Published: December 22, 2016 11:08 PM2016-12-22T23:08:31+5:302016-12-22T23:08:31+5:30
एक गंभीर : वाठारनजीक चालकाचा ताबा सुटून दुर्घटना
मलकापूर : ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर-ट्रॉलीला कारची पाठीमागून धडक बसली. या अपघातात कारमधील दोघे जागीच ठार झाले, तर एकजण गंभीर जखमी झाला. पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कऱ्हाड तालुक्यातील वाठार हद्दीत गुरुवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.
लक्ष्मण सावजी बंडलकर (वय ३९ ), संजय मारुती बसरी (दोघेही, रा. उंब्रज, मूळ रा. बेळगाव) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत, तर सुभाष मल्लेश केदारजी (रा. उंब्रज, ता. कऱ्हाड) असे गंभीर जखमीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कासेगावहून ऊस भरून एक ट्रॅक्टर ट्रॉली (एमएच २६ ७७२०) गुरुवारी पहाटे वाठारकडे येत होता. तो पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर आला असताना कोल्हापूरहून कऱ्हाडच्या दिशेने जात असलेल्या कारवरील (एमएच ५० ए ६८३ ) चालकाचा ताबा सुटून कारची उसाने भरलेल्या ट्रॉलीला धडक बसली. या अपघातात कारचा चक्काचूर झाला. अपघातात कारमधील बंडलकर व बसरी हे दोघे जागीच ठार झाले, तर सुभाष केदारजी हे गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिस मदत केंद्र्राचे सहायक पोलिस निरीक्षक अजित सिद यांच्यासह पोलिस कर्मचारी, महामार्ग देखभाल विभागाचे कर्मचारी तातडीने अपघातस्थळी दाखल झाले. जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. अपघाताची खबर कऱ्हाड तालुका पोलिसांना देण्यात आली. कऱ्हाड तालुका पोलिसांनी अपघातस्थळाचा पंचनामा करून महामार्ग वाहतुकीस खुला केला. (प्रतिनिधी)
ट्रॅक्टरचालक पसार
कारची ट्रॅक्टरला पाठीमागून धडक बसून कारचा चक्काचूर झाला; मात्र पहाटेची वेळ असल्याने परिसरात कोणीही नव्हते. संबंधित ट्रॅक्टरचालकाने खाली उतरून कारची अवस्था पाहिली. त्यावेळी इतर वाहनेही अपघातस्थळापर्यंत पोहोचली होती. मात्र, अपघाताची भीषणता पाहिल्यानंतर ट्रॅक्टरचा चालक तेथून पसार झाला. रात्री उशिरापर्यंत तो पोलिसांत हजर झाला नव्हता.