साताऱ्यातील दोन पेट्रोल पंप कराराविना सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:49 AM2021-04-30T04:49:28+5:302021-04-30T04:49:28+5:30
सातारा : साताऱ्यातील सदाशिव पेठ, जुना मोटर स्टँड परिसरात असलेले दोन खासगी पेट्रोल पंप तब्बल वीस वर्षांपासून कोणत्याही कराराविना ...
सातारा : साताऱ्यातील सदाशिव पेठ, जुना मोटर स्टँड परिसरात असलेले दोन खासगी पेट्रोल पंप तब्बल वीस वर्षांपासून कोणत्याही कराराविना सुरू आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित पेट्रोल पंपधारकांवर कारवाई करावी, अशी जनहित याचिका सामाजिक कार्यकर्ते अमित शिंदे यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे.
याचिकेत नमूद केले आहे की, जुना मोटर स्टँड येथील जागा सातारा नगरपालिकेच्या मालकीची आहे. पालिकेने दोन खासगी पेट्रोल पंप चालकांना ही जागा कराराने दिली होती. पालिका व संबंधित पेट्रोल पंपधारक यांच्यात २००१ रोजी तीन वर्षांचा करार झाला. करार संपुष्टात आल्यानंतर त्याचे नूतनीकरण करण्यात आले नाही. मात्र, दोन्ही पेट्रोल पंप आजतागायत सुरूच आहेत.
वीस वर्षांत सातारा शहराचा कायापालट झाला. शहराचा विस्तार वाढला, तसेच दोन्ही पेट्रोल पंपालगत व्यावसायिकांची संख्या देखील वाढली. पंपालगत असणारा रस्ता अरुंद आहे. या रस्त्यावरून ये-जा करताना वाहनधारकांना प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागते. मात्र, पालिकेने वीस वर्षांपासून कराराचे नूतनीकरण केले नसल्याने लाखोंचा महसूल बुडला आहे. या प्रश्नी आवाज उठविण्याचा प्रयत्न केल्यास राजकीय दबाव आणला जात असल्याचा आरोप तक्रारदार अमित शिंदे यांनी याचिकेत केला आहे. वीस वर्षांपासून सुरू असलेल्या या गैरकारभाराची सखोल चौकशी करावी, तसेच शासनाचा महसूल बुडविणाऱ्यांविरोधात फौजदारी खटला दाखल करावा, अशी मागणी अमित शिंदे यांनी केली आहे.
(चौकट)
पंपावर चक्क पोट भाडेकरू..
पेट्रोल पंपधारकांशी पालिकेने केलेल्या करारात पोट भाडेकरू ठेवल्यास संबंधित जागा तातडीने ताब्यात घेतली जाईल, असे स्पष्ट नमूद करण्यात आले होते. असे असतानाही संबंधित पेट्रोल पंपधारकांनी पालिकेच्या जागेत पोट भाडेकरू ठेवला असल्याचे शिंदे यांनी याचिकेत नमूद केले आहे. ही बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची आहे. तरीही पालिकेकडून आजतागायत कोणतीही कारवाई झालेली नाही. पालिकेचा कोणताही कायदेशीर परवाना नसताना, हे पेट्रोल पंप राजरोसपणे सुरू आहेत. त्यामुळे या प्रकरणाचीही चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.