साताऱ्यात १२ तासांत दोन राडे
By admin | Published: March 18, 2015 10:45 PM2015-03-18T22:45:53+5:302015-03-19T00:01:34+5:30
नऊ जणांवर गुन्हा : राधिका चौकात नाचविल्या नंग्या तलवारी
सातारा : शहरात मंगळवारी रात्रीपासून दोन ठिकाणी बाचाबाची, शिवीगाळ आणि हाणामारीच्या घटना घडल्या. राधिका चौकात रात्री तलवारी, कोयते अशी धारदार शस्त्रे नाचविली गेल्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले, तर शाहू चौकात युवकांमध्ये मारामारी झाली. या दोन्ही प्रकरणांत नऊ जणांविरुद्ध गुन्हे दाखल झाले आहेत.राधिका चौकातील घटनेसंदर्भात पोलीस हवालदार मोहन चव्हाण यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. जुन्या भांडणाचा राग मनात धरून मंगळवारी रात्री साडेनऊनंतर तरुणांचा एक गट शस्त्रास्त्रे घेऊन या चौकात दाखल झाला आणि मोठमोठ्याने आरडाओरडा करून तणाव निर्माण केला. कोयता, तलवार अशी शस्त्रे या युवकांच्या हातात होती. सार्वजनिक ठिकाणी शांततेचा भंग केल्याप्रकरणी विक्रम दिलीप साठे, शैलेश सुरेश जाधव, सागर शिंदे, संतोष कांबळे आणि नवनाथ पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बुधवारी सकाळी दहा ते साडेदहाच्या दरम्यान आनंदवाडी दत्तमंदिराजवळील शाहू चौकात तरुणांमध्ये मारामारी झाली. यावेळी चौकात बघ्यांची प्रचंड गर्दी जमली होती. काही कारणांवरून तरुणांमध्ये बाचाबाची झाली आणि नंतर अचानक हाणामारी सुरू झाली. चौकात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन परिस्थिती आटोक्यात आणली. पोलीस हवालदार रामचंद्र पवार यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार नाना केशव केदारी (रा. पुणे), अक्षय सयाजी सपकाळ (रा. कऱ्हाड), अविनाश सुनील घोरपडे आणि महेश विजय परदेशी (रा. सातारा) यांच्याविरुद्ध सार्वजनिक ठिकाणी तणाव निर्माण केल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या दोन्ही घटनांमुळे सातारासारख्या शांत समजल्या जाणाऱ्या शहरात भलताच तणाव निर्माण झाला होता. गर्दीच्या ठिकाणी अशा घटनांमुळे मोठा अनर्थ घडू शकणार असल्याने सावधगिरी बाळगणे आवश्यक बनले
आहे. (प्रतिनिधी)