राष्ट्रवादी कार्यकारिणीत सातारचे दोन, सांगलीचे चार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2018 12:20 AM2018-08-24T00:20:17+5:302018-08-24T00:23:20+5:30
सातारा : राष्ट्रवादी पक्षाच्या राज्य कार्यकारिणीची घोषणा प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी नुकतीच केली. या कार्यकारिणीमध्ये बालेकिल्ल्यातील अवघे दोनच सदस्य निवडण्यात आले असल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
कृष्णा साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश मोहिते यांची सरचिटणीसपदी फेरनिवड करण्यात आली. तर जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र गुदगे यांनाही कार्यकारिणी सदस्य म्हणून दुसऱ्यांदा संधी दिली आहे. आमदार पाटील यांनी जाहीर केलेल्या ९१ कार्यकारिणी सदस्यांच्या यादीत साताºयाचे केवळ दोघाच जणांचा समावेश केला आहे.
राष्ट्रवादीचे सातारा जिल्ह्यात सात आमदार आहेत. विधानसभेचे पाच तर विधानपरिषदेच्या दोन आमदारांचा त्यात समावेश आहे. जिल्हा परिषद, जिल्ह्यातील ११ पंचायत समिती, जिल्हा मध्यवर्ती बँक आदी संस्था राष्ट्रवादीच्या ताब्यात आहेत. जिल्ह्यातील बहुतांश बाजार समित्या, खरेदी-विक्री संघ, मजूर फेडरेशन आदी संस्थांवर राष्ट्रवादीचे नेतृत्व आहे.
मागील लोकसभा व विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सर्वत्र काँगे्रस व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांना मोठे धक्के बसले. पराभवाला सामोरे जावे लागले. साताºयात मात्र उलटे वारे वाहत होते. जिल्हा राष्ट्रवादीच्या पाठीशी ठाम राहिला. स्थानिक नेतृत्वांवर जनतेने विश्वास दाखविला आहे. केंद्रात व राज्यात सत्ता गेली असली तरीही साताºयात मात्र राष्ट्रवादीचीच हवा आहे. या परिस्थितीत राज्य कार्यकारिणीमध्ये साताºयातून किमान चार जणांना संधी मिळणे अपेक्षित होते.
सांगलीत मात्र पक्षाची भलतीच पिछेहाट झाली. या जिल्ह्यात राष्ट्रवादीचे केवळ दोन आमदार आहेत. सांगली महापालिकेची सत्ताही हातची गेली आहे. केंद्रात व राज्यात सत्ताबदल होताच अनेकांनी राष्ट्रवादीच्या जहाजातून भाजपच्या ‘क्रूझ’मध्ये उड्या घेतल्या. या जिल्ह्यात राष्ट्रवादीची पिछेहाट सुरू असतानाच राष्ट्रवादी नेतृत्वाने माजी मंत्री आ. जयंत पाटील यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली. सांगलीतील उतरती कळा सावरण्याचे आणि राज्यात पक्षाला पुढे घेऊन जाण्याचे मोठे आव्हान आ. पाटील यांच्यावर आहे. त्यांनी राज्य कार्यकारिणीमध्ये सांगलीतले चार सदस्य घेतले आहेत. माजी महापौर सुरेश पाटील, प्रकाश शेंडगे, अॅड. राजेंद्र डांगे, मानसिंग नाईक यांना संधी देण्यात आली आहे. राज्य कार्यकारिणीमध्ये निवड करणाऱ्यांवर सांगलीत राष्ट्रवादीला चांगले दिवस आणण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
कार्यकारिणी समितीच्या निवडीनंतर सातारा व सांगली या दोन जिल्ह्यांची तुलना होऊ लागली आहे. विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, आमदार शशिकांत शिंदे, आ. मकरंद पाटील, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. बाळासाहेब पाटील, आ. दीपक चव्हाण, आ. नरेंद्र पाटील, असे रथी-महारथी साताºयात आहेत. त्यामुळे सातारा जिल्हा राजकीयदृष्ट्या राष्ट्रवादीने भक्कम बनवला आहे. याउलट सांगली जिल्ह्यात परिस्थिती आहे. मूळ राष्ट्रवादीवासीय असणारे जतचे आमदार विलासराव जगताप, शिराळ्याचे आमदार शिवाजीराव नाईक, आटपाडीचे आमदार अनिल बाबर यांनी इतर पक्षात उडी घेतली आहे. सांगली सावरण्यासाठी आ. जयंत पाटील यांनी कार्यकारिणी समितीवर चौघांना संधी दिली आहे.
निष्ठावंतांना संधीच नाही
१९९९ पासून पक्षासोबत असणाºया निष्ठावान कार्यकर्त्यांपैकी एकाला तरी राज्य कार्यकारिणीत संधी मिळणे अपेक्षित होते. वाईचे तालुकाध्यक्ष प्रतापराव पवार यांना राज्य चिटणीसपदी संधी देण्यात आली होती. यावेळी मात्र त्यांचे नाव नव्या यादीमध्ये नाही. राज्य कार्यकारिणीतील साताऱ्याचे संख्याबळ दोन इतकेच राहिले आहे.