गवडीतील दोन शाळकरी मुलांचा तलावात बुडून मृत्यू, मित्रांसोबत गेले होते पोहायला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2023 10:57 PM2023-04-08T22:57:08+5:302023-04-08T22:57:36+5:30
हे दोघेही एकुलते एक होते. यामुळे त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे...
सातारा : गवडी, ता. सातारा येथे पोहायला गेलेल्या दोन चिमुकल्या शाळकरी मुलांचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना शनिवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. विशेष म्हणजे दोघेही एकुलते एक होते. यामुळे त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
स्वराज सतीश घोरपडे (वय ११), सोहम संतोष घाडगे (वय १०, रा. गवडी, ता. सातारा) अशी तलावात बुडून मृत्यू झालेल्या चिमुकल्यांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, गवडीतील प्राथमिक शाळेत शिकत असलेली तीन मुले गावापासून एक किलोमीटरवर असलेल्या सारखळच्या तलावात पोहण्यासाठी गेली होती. स्वराज आणि सोहम हे दोघे तलावात उतरले. त्यांना पोहता येत नव्हते. अचानक दोघेही गटांगळ्या घेऊ लागले. तलावाच्या काठावर असलेल्या दुसऱ्या मित्राच्या हा प्रकार लक्षात आला. त्याने आरडाओरड केली. मात्र, काही वेळातच दोघेही तलावात बुडाले. या प्रकारानंतर त्यांच्यासोबत असलेल्या मित्राने गावात येऊन या घटनेची माहिती दिली. त्यानंतर गवडीतील तसेच आजूबाजूच्या शेतात काम करत असलेल्या नागरिकांनी तलावाकडे धाव घेतली. ग्रामस्थांनी तलावात उतरून दोघांचेही मृतदेह बाहेर काढले.
एकाच गावातील या दोघा चिमुकल्यांचा अशा प्रकारे दुर्दैवी मृत्यू झाल्याने गवडी परिसरासह सर्वत्र हळहळ व्यक्त आहे. दोघेही एकुलते एक होते. यामुळे त्यांच्या कुटुंबाला जबर मानसिक धक्का बसला आहे. सातारा तालुका पोलिस ठाण्यात या घटनेची रात्री उशिरापर्यंत नोंद झाली नव्हती.