सातारा तालुक्यातील दोन शाळांमध्ये चोरी, अज्ञाताने सिलिंडर नेले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 02:22 PM2018-03-13T14:22:51+5:302018-03-13T14:22:51+5:30
सातारा तालुक्यातील पेट्री बंगला जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा व पेटेश्वरनगर येथील आदर्श माध्यमिक विद्यालय या दोन शाळांमध्ये चोरी करून अज्ञाताने सुमारे २५ हजारांचा ऐवज लंपास केला. सोमवारी रात्रीच्या सुमारास ही चोरी झाली. दरम्यान, या चोरीत कटावणीचा वापर करण्यात आला असून सिलिंडर नेण्यात आले आहेत. तसेच चोरीतील साहित्य नेण्यासाठी तांदळाच्या पोत्याचा वापर करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे.
पेट्री : सातारा तालुक्यातील पेट्री बंगला जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा व पेटेश्वरनगर येथील आदर्श माध्यमिक विद्यालय या दोन शाळांमध्ये चोरी करून अज्ञाताने सुमारे २५ हजारांचा ऐवज लंपास केला. सोमवारी रात्रीच्या सुमारास ही चोरी झाली.
दरम्यान, या चोरीत कटावणीचा वापर करण्यात आला असून सिलिंडर नेण्यात आले आहेत. तसेच चोरीतील साहित्य नेण्यासाठी तांदळाच्या पोत्याचा वापर करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे.
पेटेश्वरनगर येथील विद्यालयाची शाळा सकाळी होती. त्यामुळे शिपायाने सकाळी शाळेचे गेट उघडल्यावर कटावणी सापडली. त्यानंतर शाळेच्या खोल्या, किचनशेड उघडे दिसून आले. शाळेत चोरी झाल्याचे शिपायाच्या लक्षात आले. त्यामुळे शिपायाने हा प्रकार नागरिक, मुख्याध्यापकांना सांगितला.
पेट्री बंगला प्राथमिक केंद्रशाळेच्या पाठीमागील बाजुस असणारे आहार शिजवून देण्याचे किचनशेड फोडण्यात आले. तेथून एक गॅस सिलिंडर तसेच साधारण ३५ ताटे चोरून नेण्यात आली आहे. अशी माहिती मुख्याध्यापक प्रल्हाद पार्टे यांनी दिली. तसेच या शाळेच्या जवळ असणाऱ्या आदर्श माध्यमिक विद्यालयाचे किचन शेड फोडून दोन गॅस सिलिंडर तसेच इर्न्व्हटरची बॅटरी चोरून नेण्यात आली.
शाळेच्या प्रयोगशाळेच्या खोलीसह अन्य तीन खोल्यांचे कुलुप कटावणीच्या साह्याने तोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांसाठीचा पोषण आहार असणाऱ्या खोलीत अस्ताव्यस्तपणा करून काही पोती रिकामे करून बाजुला तांदूळ टाकण्यात आला आहे.
त्या पोत्याचा वापर चोरलेले साहित्य नेण्यासाठी केला असावा, अशी शक्यता मुख्याध्यापक हणमंत क्षीरसागर यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, चोरट्यांनी वापर केलेली कटावणी शालेय आवारात सापडली आहे. चोरीच्या या घटनेची माहिती मुख्याध्यापकांनी सातारा तालुका पोलिसांना दिली आहे.