दुमजली गुहा... तलवारीच्या आकाराची विहीर अन् लांबलचक मोरघळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:41 AM2021-09-26T04:41:59+5:302021-09-26T04:41:59+5:30
समर्थ रामदास स्वामी यांच्या ध्यानधारणेची दुमजली गुहा, तलवारीच्या आकाराची विहीर, लांबलचक मोरघळ, बौद्ध धर्माचा उदय झाल्यानंतर इसवी पूर्व दुसऱ्या ...
समर्थ रामदास स्वामी यांच्या ध्यानधारणेची दुमजली गुहा, तलवारीच्या आकाराची विहीर, लांबलचक मोरघळ, बौद्ध धर्माचा उदय झाल्यानंतर इसवी पूर्व दुसऱ्या शतकातील लेणी, हेमाडपंथी मंदिरे आणि कोसळणाऱ्या धबधब्याच्या आतील बाजूच्या गुहा हे सगळं सातारा जिल्ह्यात अस्तित्वात आहे. पण, अनेकांनी साताऱ्याची ही समृद्धता पाहिली नाही, ती पाहायची असेल तर आठवड्यातील एक दिवस या न पाहिलेल्या वाटेने जाणं हाच उत्तम वीकेंड ठरेल.
सातारा जिल्ह्यातील पर्यटन म्हटलं की, कास पठार, ठोसेघरचा धबधबा, निसर्गरम्य महाबळेश्वर पाचगणी धार्मिक स्थळ म्हणून सज्जनगड, चाफळ, गोंदवले, पुसेगाव ही बोटांवर मोजण्याइतकीच ठिकाणं नजरेसमोर येतात. निसर्गाची मुक्त हस्ते उधळण लाभलेल्या या जिल्ह्यातील पर्यटनाच्या अनवट वाटा शोधून तिथे पर्यटकांना नेण्यासाठी शैलेश करंदीकर आणि प्रशांत बोरा हे दोघे प्रयत्नशील आहेत. शहराच्या धावपळीतून निसर्गाच्या सान्निध्यात पुरातन वास्तू, घळी, गुहा आणि हेमाडपंथी खजिना पाहिल्यानंतर अनेकांना ही ठिकाणं सातारा जिल्ह्यात आहेत, यावर विश्वासच बसत नाही.
पाटण तालुक्यात चाफळ गावातून जाणाऱ्या रस्त्याने पुढे गेले की, काही अंतरावर शिंगणवाडी गाव लागते. येथे पायी अंतर पार केल्यानंतर चक्क दुमजली गुहा पाहायला मिळते. दगडात कोरलेल्या या गुहेत समर्थ रामदास स्वामी ध्यानधारणेसाठी यायचे, याचे पुरावे आढळून आले आहेत. जिल्ह्यातील ९ ठिकाणी स्वामींच्या अस्तित्वाविषयी बोलले जाते. मात्र, त्यातील चार ठिकाणी ते गेल्याचे आणि त्यांनी ध्यानधारणा केल्याचे ठोस पुरावेही आहेत. किकळी आणि परळी भागातील हेमाडपंथी मंदिर हे अभ्यासकांचे आवडीचे ठिकाण आहे. मंदिर रचनेचा अभ्यास करायला येणाऱ्या अनेकांना या रचनांनी मोहात पाडले आहे.
सातारा तालुक्यातील परळी येथून पांगारीमार्गे सांडवलीमधून अर्धा तास ट्रेक केल्यानंतर मोरघळ आढळते. जिल्ह्यातील सर्वाधिक मोठी घळ म्हणून तिचा लौकिक आहे. एका अख्यायिकेनुसार मोरघळीत गेलेले वासरू महाबळेश्वरमध्ये आढळल्याचे सांगितले जाते. अनेकदा यातून प्रवास करण्याचा प्रयत्न पर्यटकांनी केला. पण, गुहेच्या शेवटच्या टोकापर्यंत जाणं अद्याप तरी कोणालाही शक्य झालं नाही. बौद्ध धर्माचा उदय झाला तेव्हा म्हणजे इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकात कऱ्हाड तालुक्यातील आगाशिवनगर डोंगरावर सर्वाधिक लेणी आढळून येतात. येथे एकाच ठिकाणी तब्बल ६३ लेखी आहेत, ज्या अभ्यासकांना भुरळ घालतात. इतक्या वर्षांनीही येथील कोरीव काम मोहात पाडते. पाटण तालुक्यातील दातेगड किल्ल्यावर तलवारीच्या आकाराची विहीर आहे, ती पर्यटकांना मोहीत करते. प्रवेशद्वारावर गणपती आणि मारुतीची मोहक शिल्पे कोरली आहेत. ती पाहणंही पर्यटकांना पर्वणीच ठरतेय!
कोट :
सातारा जिल्ह्यात पर्यटनाची अनेक लुप्त ठिकाणं आहेत. गेल्या सहा वर्षांत ती स्वत: शोधल्यानंतर तिथं पर्यटकांना नेण्याचा मोह आवरता आला नाही. अनवट वाटा शोधून काढून राज्यातील विविध टोकांवरून आलेल्या पर्यटकांना ते दाखविण्यात वेगळा आनंद आहे. ‘आम्ही हे यापूर्वी कधीच पाहिलं नाही’ ही पर्यटकांची प्रतिक्रिया लपलेली स्थळं शोधण्याची नवीन ऊर्जा देते.
- शैलेश करंदीकर, पर्यटनप्रेमी, सातारा
- प्रगती जाधव पाटील