दोन हजारांचा वापर बिले मात्र अडीचशे
By admin | Published: December 3, 2015 09:52 PM2015-12-03T21:52:18+5:302015-12-03T23:52:48+5:30
वीजवितरणचा कारभार : दोन महिन्यांपासून मीटरचे फोटो गायब
सातारा : कोणत्याही शासकीय यंत्रणेचे खासगीकरण झाल्यानंतर काय होऊ शकते, याचा प्रत्येय सध्या जिल्ह्यातील वीजग्राहक घेऊ लागले आहेत. जिल्ह्यातील काही भागात अतिशय कमी वापर झालेला असताना २५ ते ३० हजारांपर्यंत वीजबिल आकारण्याची करामत केली आहे. सातारा परिसरातील काही भागातील ग्राहकांना मात्र भलताच अनुभव येऊ लागला आहे. दरवेळचे सरासरी वापर हजार दोन हजार असताना केवळ दोन ते चार रुपयांची बिले दिली आहेत. बिलावरून मीटर युनिट रिडिंगचा फोटोही गायब झाला आहे.वीज बिलातील घोटाळे हे नवीन नाहीत. अनेक भागांत प्रमाणापेक्षा जास्त बिल येत असल्याची तक्रारी ग्राहकांतून येत आहेत. बिल जास्त आले म्हणून ते लवकर भरत नाहीत. बिल भरले नाही म्हणून जोडणी कट केली जाते. त्यामुळे ग्राहकांचा संताप अनावर होतो. एकदा आलेले बिल कमी करण्यासाठी अधिकाऱ्यांकडे हेलपाटे मारावे लागतात. ते त्यांच्या अधिकारात कमी करून देतात; मात्र उर्वरित रक्कम पुढच्या बिलात आकारली जाते. या सर्व तक्रारींचा विचार करून वीजवितरण कंपनीने काही वर्षांपूर्वी पथदर्शी उपक्रम राबविला होता. कंपनीचे खासगीकरण झाल्यानंतर मीटर युनिट रिडिंग, बिलांचे वाटप यासाठी ठेकेदार नेमले आहेत. रिडिंग घेताना मीटरचे फोटो घेऊन येतील. रिडिंग युनिटचा फोटोच बिलावर प्रसिद्ध झाल्याने तक्रारी कमी होतील व कामात सुसूत्रता येण्याची आशा निर्माण झाली होती. सातारा शहरापासून काही अंतरावर असलेल्या दरे बुद्रुक परिसरातील अनेक ग्राहकांच्या बिलाचे दोन महिन्यांपासून रिडिंगच झालेले नाही. दरवेळी फोटोचा रकाना रिकामा येत आहे. त्यामुळे सरासरी बिल आकारले जात आहे. ज्यांचा दरमहिन्याचा सरासरी वापर दीड ते दोन हजार रुपये येत आहेत, त्यांना अवघे दोनशे रुपयांचे बिल दिले आहे. (प्रतिनिधी)
सर्वच ग्राहकांच्या विद्युत मीटरचे फोटो रिडिंग घेणे बंधनकारक आहे. अपवादात्मक परिस्थितीत घर बंद असेल तर रिडिंग घेता येत नाही. तरीही यासंदर्भात अशा घटना घडल्या असल्यास तत्काळ रिडिंग घेतले जाईल. त्या आशयाच्या सूचना संबंधित विभागाला केल्या जातील.
- सुरेश गणेशकर --अधीक्षक अभियंता, वीज वितरण कंपनी, सातारा
सहन करावा लागणार भुर्दंड
खासगी ठेका दिल्याने ग्राहक कोणालाही बोलू शकत नाहीत. विचारले असता ‘घर बंद असल्याने रिडिंग घेतले नाही’ हे कारण सांगितले जाते. मात्र, एक-दोन महिन्यांनी मागचे सर्व रिडिंगचा वापर दाखविला जाणार आहे. त्यावेळी मागील सर्व बिल एकदम भरावे लागणार आहे. बिल न भरल्यास जोडणी तोडण्यास पुढचा विभाग सज्ज आहेच.