कोयनेत दोन टीएमसीने वाढ

By admin | Published: July 4, 2016 12:12 AM2016-07-04T00:12:48+5:302016-07-04T00:12:48+5:30

जिल्ह्यात संततधार कायम : वाई, महाबळेश्वर, जावळी, पाटणमध्ये पावसाचा जोर

Two TMC increases in Koyane | कोयनेत दोन टीएमसीने वाढ

कोयनेत दोन टीएमसीने वाढ

Next

सातारा / महाबळेश्वर : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे धरणातील पाणसाठ्यात झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. रविवारी सायंकाळी
पाच वाजता झालेल्या चोवीस तासांत धरणात तब्बल २.१४ टीएमसीने पाण्यात वाढ झाली आहे.
कोयना येथे शनिवारी १५६, नवजा येथे १९६, तर महाबळेश्वरमध्ये १६४ मिलिमीटर पाऊस झाला. त्यामुळे कोयना धरणातील पाण्याची आवक वाढली आहे. याचा परिणाम पाणीसाठ्यावर झाला आहे. अवघ्या चोवीस तासांत २.१४ टीएमसीने वाढ झाली आहे. धरणात सध्या १६.५१ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. सातारा जिल्ह्यातील वाई, महाबळेश्वर, जावळी, पाटण, सातारा तालुक्यांत गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच धरणांतील पाणीसाठ्यात वाढ होऊ लागली आहे.
सातारा शहरातही शनिवारी रात्रभर आणि रविवारी दिवसभर पावसाची संततधार सुरू होती. आठवड्याची सुटी असूनही रविवारच्या आठवड्या बाजारात तसेच मुख्य बाजारपेठेत शुकशुकाट जाणवत होता. सायंकाळी सहानंतर काहीकाळ पावसाने विश्रांती घेतली.
महाबळेश्वर : तालुक्यात रविवारी पावसाचा जोर वाढला असून, मुसळधार पाऊस सुरूच आहे. शनिवार, रविवार सुटीचे दिवस असल्याने सकाळपासून पर्यटकांनी महाबळेश्वर गजबजून गेले होते. बाजारपेठेत पर्यटकांची मोठी गर्दी दिसून येत होती.
वेण्णा लेकवर मुसळधार पावसात भिजण्याचा आनंद पर्यटक लुटत होते. काही पर्यटक भर पावसात नौकाविहार करण्यात मग्न होते. संततधार पावसाने वेण्णा लेकच्या पाणी पातळीत चांगलीच वाढ झाली आहे. महाबळेश्वरमध्ये या हंगामात आतापर्यंत ९१७.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात रविवारी सकाळी झालेल्या चोवीस तासांमध्ये तालुकानिहाय पडलेला पाऊस मिलिमीटरमध्ये असा : सातारा २८.२, जावळी ५५.३, कऱ्हाड १७.३, कोरेगाव २०.१, खटाव १४.८, माण ५.१, फलटण १.२, खंडाळा २५.१, वाई २९.३, महाबळेश्वर १५५.१ मिली. (प्रतिनिधी)
दरड कोसळण्याचे सत्र सुरूच
पेट्री : सातारा-कास मार्गावरील यवतेश्वर घाटातील दरड कोसळण्याचे सत्र शनिवारपासून सुरूच आहे. या घाटात पुन्हा रविवारी सकाळी दरड कोसळली. यामुळे काहीकाळ वाहतूक ठप्प झाली होती. एसटी कर्मचारी व प्रवाशांनी दरड हटविल्याने वाहतूक सुरळीत झाली.
सातारा-कास मार्गावरील यवतेश्वर घाटात रविवारी सकाळी दरड कोसळली. एसटी कर्मचारी व प्रवाशांनी ती हटविल्याने वाहतूक सुरळीत झाली.

Web Title: Two TMC increases in Koyane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.