‘ती’ दुचाकी साताऱ्यातील
By admin | Published: July 11, 2014 12:28 AM2014-07-11T00:28:30+5:302014-07-11T00:31:54+5:30
‘एटीएस’ पथक दाखल : पोलीस राजगे यांच्याकडे चौकशी सुरू
सातारा : पुणे येथे फरासखाना पोलीस ठाण्यासमोर झालेल्या स्फोटात वापरलेली दुचाकी सातारा जिल्हा पोलीस दलातील पोलीस शिपाई डी. बी. राजगे यांची असल्याचे समोर आले आहे. न्यायालयाच्या आवारातून राजगे यांची दुचाकी चोरीस गेली होती. याबाबत शहर पोलीस ठाण्यात नोंदही आहे. दरम्यान, या घटनेनंतर एटीएसचे पथक गुरुवारी रात्री साताऱ्यात आले. पोलीस कर्मचारी राजगे यांच्याकडे रात्री उशिरापर्यंत कसून चौकशी सुरू होती.
पुणे येथे दुचाकीचा वापर करून स्फोट झाल्याचे समजल्यानंतर दुचाकीच्या चॅसी, इंजिन नंबरवरून ती दुचाकी पोलीस मुख्यालयात नेमणुकीस असलेले पोलीस शिपाई राजगे यांची असल्याचे तपासात उघडकीस आले. त्यानंतर पुणे पोलिसांनी थेट राजगे यांच्याशी संपर्क साधून खातरजमा केली. त्यानंतर रात्री एटीएसचे पथक साताऱ्यात दाखल झाले. अतिरिक्त पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या केबीनमध्ये राजगे यांना बोलावण्यात आले होते. रात्री उशिरापर्यंत राजगे यांची चौकशी सुरू होती. यावेळी पोलीस निरीक्षक राजीव मुठाणे उपस्थित होते.
दरम्यान, जिल्हा न्यायालयाच्या आवारातून दि. २५ जून रोजी राजगे यांची हिरोहोंडा स्प्लेंडर (एमएच ११ क्यू ७१७६) दुचाकी चोरीला गेली होती. दोन दिवस त्यांनी दुचाकीचा शोध घेतला. मात्र दुचाकी सापडली नाही. त्यानंतर त्यांनी दि. २७ जून रोजी सातारा शहर पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीला गेल्याची तक्रार नोंदवली होती. (प्रतिनिधी)