साताऱ्यात मतदान जागृतीसाठी अधिकारी दुचाकीवर; अनेक गावांतून मार्गस्थ..
By नितीन काळेल | Published: May 3, 2024 08:20 PM2024-05-03T20:20:22+5:302024-05-03T20:20:56+5:30
नागरिकांचाही मोठा सहभाग : १०० टक्के मतदानासाठी प्रशासन प्रयत्नशील
सातारा : लोकसभा निवडणुकीत १०० टक्के मतदान होण्यासाठी जिल्हा प्रशासन विविध पातळीवर प्रयत्न करत असून शुक्रवारी दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये अधिकारी, कर्मचाऱ्यांसह शेकडोंच्या संख्येने नागरिकही सहभागी झाले होती. ही रॅली अनेक गावांतून मार्गस्थ झाल्याने मतदानाबाबत जागृती होण्यास मदत झाली.
सातारा लोकसभा मतदारसंघासाठी दि. ७ मे रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत १०० टक्के मतदान होण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे. यासाठी आतापर्यंत पर्यटनस्थळी जागृती, मानवी साखळी आदींद्वारे मतदारांत जनजागृती करण्यात आलेली आहे. आता स्वीप कार्यक्रमाच्या नोडल अधिकारी तथा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या मार्गदर्शनाखाली दुचाकी रॅली काढण्यात आली.
साताऱ्यात जिल्हा परिषद मैदानावरुन या दुचाकी रॅलीला सुरूवात झाली. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी नागराजन, पोलिस अधीक्षक समीर शेख, अतिरिक्त पोलिस अधीक्षक आॅंचल दलाल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक संतोष हराळे, सामान्य प्रशासनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश घुले आदींसह अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते.
साताऱ्यातील ही रॅली पोवई नाका, मोळाचा ओढा, वर्ये, नेले, किडगाव, कळंबे, माळ्याचीवाडी, साबळेवाडी, कोंडवेमार्गे साताऱ्यात आली. या रॅलीत सुमारे ७०० दुचाकींचा समावेश होता. तसेच जिल्ह्याच्या इतर तालुक्याच्या ठिकाणीही या रॅलीचे आयोजन करण्यात आलेले. त्यामुळे मतदानाबाबत मोठी जनजागृती होण्यास मदत झाली. ही रॅलीने १५ ते २० किलोमीटरचे अंतर पार केले. तसेच अनेक गावांतूनही मार्गस्थ झाली.
शनिवारी जागृतीसाठी गृहभेट कार्यक्रम
जिल्हा प्रशासनाच्यावतीने मतदार जागृतीचे काम निवडणुकीच्या शेवटच्या तासापर्यंत केले जाणार आहे. या अंतर्गतच आता दि. ४ मे रोजी गृहभेट दिवस ठेवण्यात आलेला आहे. शासकीय अधिकारी आणि कर्मचारी नियुक्तीच्या ठिकाणी तसेच निवास परिसरात गृहभेटी देणार आहेत. यातून मतदारांत मतदानाविषयी जागृती करावी लागणार आहे.