मतदान जागृतीसाठी साताऱ्यात उद्या दुचाकी रॅली, शनिवारी गृहभेटी
By नितीन काळेल | Published: May 2, 2024 07:34 PM2024-05-02T19:34:21+5:302024-05-02T19:35:04+5:30
प्रशासनाच्या उपाययोजना : निवडणुकीत १०० टक्के मतदानासाठी कुटुंबांचीही जबाबदारी
सातारा : लोकसभा निवडणुकीत १०० टक्के मतदान होण्यासाठी जिल्हा प्रशासन विविध पातळीवर प्रयत्न करत असून उपायोजनाही राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणजे दि. ३ रोजी जिल्ह्यात दुचाकी रॅली काढण्यात येणार आहे. तर ४ मे रोजी गृहभेटीचा कार्यक्रम ठेवला आहे. तसेच कुटुंबातील सर्वांना मतदानासाठी आणण्याची जबाबदारीही शासकीय पथकाला देण्यात आलेली आहे हेही विशेष आहे.
सातारा लोकसभा मतदारसंघासाठी दि. ७ मे रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत १०० टक्के मतदान होण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे. यासाठी आतापर्यंत पर्यटनस्थळी जागृती, मानवी साखळी आदींद्वारे मतदारांत जनजागृती करण्यात आलेली आहे. आता स्वीप कार्यक्रमाच्या नोडल अधिकारी तथा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या सूचनेप्रमाणे आता दुचाकी रॅली आणि गृहभेटी कार्यक्रमातून मतदारांत जागृती करण्यात येणार आहे. यासाठी प्रशासनही सज्ज झाले आहे.
दि. ३ मे रोजी दुपारी ४ ते ६ या वेळेत दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीच्या मार्गावर अधिकाधिक गावे समाविष्ट होतील असे नियोजन करण्यात आलेले आहे. तालुक्याच्या मुख्यालयातून रॅली सुरू होणार आहे. या रॅलीत प्राधान्याने शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सहभाग राहणार आहे. तसेच एका दुचाकीवर दोघेजणच असतील. त्यांनी हेल्मेटचा वापर करणे आणि त्यांना चालकाचा परवाना आवश्यक आहे. या रॅलीपूर्वी मतदार जागृतीसाठी चित्ररथ असणार आहे. ही रॅली १५ ते २० किलोमीटरदरम्यान निघणार आहे.
जिल्हा प्रशासनाच्यावतीने मतदार जागृतीचे काम निवडणुकीच्या शेवटच्या तासापर्यंत केले जाणार आहे. या अंतर्गतच दि. ४ मे रोजी गृहभेट दिवस ठेवण्यात आलेला आहे. शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी नियुक्त ठिकाणी तसेच निवास परिसरात गृहभेटी द्यायच्या आहेत. यातून मतदारांत मतदानाविषयी जागृती करावी लागणार आहे.