ओव्हरटेकच्या प्रयत्नात दुचाकी घुसली एसटीखाली, दोघे गंभीर जखमी; मलकापुरातील पादचारी पुलाजवळ अपघात
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2023 11:59 AM2023-06-27T11:59:05+5:302023-06-27T11:59:17+5:30
अपघातानंतर वाहतूक काही काळ विस्कळीत
मलकापूर : ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात दुचाकी एसटीखाली घुसून झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोन्ही तरुण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर येथील पादचारी पुलाजवळ सातारा मार्गिकेवर सोमवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास झाला. अपघातानंतर वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. जखमींना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. संचित रमेश कुदळे (वय २३), राहुल वसंत कुंभार (२४, दोघेही रा. ओंड ता. कऱ्हाड) अशी जखमींची नावे आहेत.
घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मेढा आगाराची एसटी (एमएच ०७ सी ७१४३) ही नृसिंहवाडी येथून प्रवासी घेऊन सातारा-मेढा येथे जात होती. कऱ्हाड बसस्थानकात जाऊन सातारा दिशेने जात असताना येथील पादचारी पुलाजवळ सातारा यूटर्नवर आली असता ओंडकडे निघालेली दुचाकी (एमएच ११ एबी ४७१९) वरील युवकांनी एसटीला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. हा प्रयत्न नेमका सातारा यूटर्नवरच झाल्यामुळे दुचाकी एसटीच्या समोरील बाजूला एसटीखाली घुसली.
या अपघातात दुचाकीवरील दोन्हीही युवक दुचाकीसह फरपटत गेल्यामुळे गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच कऱ्हाड शहर पोलिस ठाण्याच्या वाहतूक शाखेचे पोलिस कर्मचारी प्रशांत जाधव, धीरज चतुर यांच्यासह महामार्ग विभागाचे दस्तगीर आगा, जगनाथ थोरात, विवेक दुधात हे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी नागरिकांच्या मदतीने जखमी युवकांना उपचारासाठी रुग्णालयात हलविले. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहनांचा पंचनामा करून वाहने ताब्यात घेतली आहेत. अपघाताची नोंद शहर पोलिस ठाण्यात करण्याची कार्यवाही रात्री उशिरापर्यंत सुरू होती.