साताऱ्यात दुचाकी चोरीचे सत्र सुरूच, रात्रीत तीन दुचाकी चोरीस: पोलिसांपुढे आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 12:25 PM2019-03-28T12:25:00+5:302019-03-28T12:27:49+5:30
सातारा शहर व परिसरात दुचाकी चोरीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढले असून, मंगळवारी मध्यरात्री साताऱ्यातून तीन दुचाकी चोरीस गेल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकारामुळे वाहनधारकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.
सातारा: शहर व परिसरात दुचाकी चोरीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढले असून, मंगळवारी मध्यरात्री साताऱ्यातून तीन दुचाकी चोरीस गेल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकारामुळे वाहनधारकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून शहर आणि परिसरातून दुचाकी चोरीस जाण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे वाहन धारकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. मंगळवार पेठेतील गणेश प्रमोद हेंद्रे (वय २८) यांची मंगळवारी मध्यरात्री मोटारसायकल त्यांच्या घरासमोरून अज्ञात चोरट्यांनी लंपास केली.
त्यांच्या गाडीची किंमत सुमारे दहा हजार रुपये होती. हिरापूर, ता. सातारा येथून सोमनाथ अंकुश अडागळे (रा. परळी, ता. सातारा) यांचीही दुचाकी (क्र. एमएच ११ सी.एस. ३७३१) चोरट्यांनी लंपास केली. त्यांच्या दुचाकीची किंमत सुमारे २० हजार रुपये होती. या घटनेची सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.
दरम्यान, येथील यादोगोपाळ पेठेतील सारंग माने (वय ३०) यांचीही दुचाकी मंगळवारी मध्यरात्री चोरीस गेली. एकाच रात्री साताऱ्यातून तीन दुचाकी चोरीस गेल्याने वाहनधारकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. पोलिसांनी पाळत ठेवून चोरट्यांच्या मुसक्या आवळाव्या, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.