कारने पाठीमागून ठोकरल्याने दुचाकीस्वार ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2019 12:59 PM2019-03-21T12:59:12+5:302019-03-21T13:00:01+5:30
पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील वेळे हद्दीत खंबाटकी घाटाच्या तीव्र उतारावर दुचाकीला कारने पाठीमागून धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वार किसन परबती भिलारे (रा. शेते ता. जावली) यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची नोंद भुईंज पोलीस ठाण्यात झाली आहे.
वेळे : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील वेळे हद्दीत खंबाटकी घाटाच्या तीव्र उतारावर दुचाकीला कारने पाठीमागून धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वार किसन परबती भिलारे (रा. शेते ता. जावली) यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची नोंद भुईंज पोलीस ठाण्यात झाली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, किसन परबती भिलारे हे पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरून दुचाकीवरून शेते गावाकडे बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास निघाले होते. ते वेळे हद्दीत आले असता पाठी मागून आलेली भरघाव कार (एमएच ३१ केएक्स ८७०८) हिने भिलारे यांना धडक दिली. यामध्ये ते वीस ते पंचवीस फुट उंच उडून कारच्या पुढील काचेवर आदळले. त्यात ते गंभीर जखमी होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या अपघाताची माहिती भुईंज पोलिसांना समजताच सहायक फौजदार आर. झेड. कोळी हे घटनास्थळी दाखल झाले. कारसह चालक विनायक गणपती गोपाळे यास ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.