‘पार्कींग’मधील दुचाकी होताहेत लंपास!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:38 AM2021-03-10T04:38:32+5:302021-03-10T04:38:32+5:30

कऱ्हाड : शहरात चोरीला जाणाऱ्या वाहनांची संख्या हजारोंच्या घरात आहे. मात्र, त्यातही दुचाकी चोरीस जाण्याच्या घटना जास्त आहेत. गत ...

Two-wheelers in the 'parking lot' are lamps! | ‘पार्कींग’मधील दुचाकी होताहेत लंपास!

‘पार्कींग’मधील दुचाकी होताहेत लंपास!

Next

कऱ्हाड : शहरात चोरीला जाणाऱ्या वाहनांची संख्या हजारोंच्या घरात आहे. मात्र, त्यातही दुचाकी चोरीस जाण्याच्या घटना जास्त आहेत. गत काही वर्षांत हजारपेक्षा जास्त दुचाकी शहरातून चोरीला गेल्या आहेत. त्यापैकी काही गुन्हे उघडकीस आले असले तरी शेकडो दुचाकी अद्यापही गायब आहेत. चोरीस गेलेली आपली दुचाकी सापडेल, या आशेने काही दुचाकीधारक आजही पोलीस ठाण्याच्या चकरा मारताना दिसताहेत.

कऱ्हाड शहरातून दुचाकी चोरीस जाण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे़ रस्त्याकडेला अथवा ‘पार्किंग झोन’मध्ये पार्क केलेली दुचाकी चोरटे लंपास करीत आहेत. दुचाकी चोरताना बहुतांशवेळा चोरट्यांकडून बनावट चाव्यांचा वापर करण्यात येतो. मात्र, काही चोरटे ‘लॉक’ खराब झालेल्या दुचाकींवर लक्ष ठेवून असतात, तसेच नवीन गाडीचे वायरिंग सोडवूनही त्या लंपास केल्या जातात़ चोरलेल्या दुचाकींचा परजिल्ह्यात व्यवहार करण्यात येतो. कागदपत्र नसल्याने अत्यल्प किमतींमध्ये त्या विकल्या जातात़ दुचाकी चोरीस गेल्यानंतर संबंधित दुचाकीचा मालक पोलीस ठाण्यात जाऊन चोरीची रीतसर फिर्याद दाखल करतो़ पोलीसही फिर्याद नोंदवून घेऊन तपास सुरू करतात; पण पुढे त्या तपासाचे काय होते, या प्रश्नाचे उत्तर दुचाकी मालकाला मिळतच नाही़

काही वर्षांपूर्वी दुचाकी चोरीस जाण्याच्या घटना बोटावर मोजण्याइतपत असायच्या. त्यामुळे त्याचा गांभीर्याने तपासही व्हायचा. चोरटा हाताला लागलाच तर चोरीची दुचाकीही हस्तगत व्हायची. मात्र, सध्याची स्थिती धक्कादायक आहे. दररोज दुचाकी चोरीच्या घटना पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचताहेत, त्यामुळे दुचाकी चोरीस जाण्याचे प्रकार पोलिसांसह वाहनधारकांनाही नवीन राहिलेले नाहीत.

- चौकट

चोरट्यांना मिळते आयती संधी

बहुतांश दुचाकीधारक रस्त्याकडेला बिनधास्तपणे गाडी पार्क करून निघून जातात. आपली दुचाकी ‘लॉक’ झाली आहे की नाही, याची साधी खातरजमाही त्यांच्याकडून केली जात नाही, तसेच दुचाकीचे ‘लॉक’ खराब झाले असेल किंवा वायरिंग सुस्थितीत नसेल तर त्याची दुरुस्ती करण्याबाबतही टाळाटाळ केली जाते. परिणामी, चोरट्यांना ही आयती संधी चालून येते.

- चौकट

चैनीसाठी केली जाते चोरी

दुचाकी चोरीप्रकरणी गुन्हे प्रकटीकरण शाखेने यापूर्वी काही जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडे पोलिसांनी चौकशी केली असता फक्त मौजमजा व चैन करण्यासाठी दुचाकी चोरल्याचे अनेकांनी सांगितले. या टोळीमध्ये बहुतांश वेळा महाविद्यालयीन युवकही पोलिसांच्या जाळ्यात सापडतात.

- चौकट

किरकोळ किमतीला विक्री

चोरून आणलेली दुचाकी बहुतांशवेळा जिल्ह्याबाहेर विकली जाते. त्यासाठी परजिल्ह्यातील एखाद्या गुन्हेगारास हाताशी धरले जाते. संबंधित दुचाकी कितीही चांगली असली तरी त्याची कागदपत्रे हाती नसल्यामुळे अशा दुचाकी पाच ते दहा हजारांनाही विकल्या जातात.

- चौकट

बारा वर्षे : हजारवर दुचाकी चोरीस

कऱ्हाड शहर पोलिसांच्या हद्दीतून गत चौदा वर्षांत हजारवर दुचाकी चोरीस गेल्या आहेत. त्यापैकी काही दुचाकी हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. अनेक दुचाकींचा तपास वर्षानुवर्षे ‘पेंडिंग’ आहे. संबंधित दुचाकी सध्या रस्त्यावर असतील की नाही, याबाबतही शंका आहे.

- चौकट

ओळख लपविण्यासाठी मोडतोड

दुचाकी चोरली की ती कोणाला ओळखू नये, याची खबरदारी चोरट्यांकडून घेतली जाते. त्यासाठी दुचाकीवर पूर्वीपासून असलेले रेडियम व नावे खोडून काढली जातात. नंबरप्लेट व त्यावरील नंबर बदलला जातो. कधीकधी सीट कव्हरही काही चोरटे बदलतात. आरसा काढून टाकतात. ज्यामुळे संबंधित दुचाकी मूळ मालकासमोरून गेली तरी त्याला ती ओळखू येत नाही.

चोरीस गेलेल्या दुचाकी

वर्षदुचाकी चोरी

२००६ ३५

२००७ ५१

२००८ ६९

२००९ ८३

२०१० ५७

२०११ ५९

२०१२ ७७

२०१३ ६५

२०१४ ५६

२०१५ ८६

२०१६ ७४

२०१७ ६८

२०१८ ४५

२०१९ ४०

२०२० १८

फोटो : ०९केआरडी०६

कॅप्शन : प्रतीकात्मक

Web Title: Two-wheelers in the 'parking lot' are lamps!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.