कुचीजवळील अपघातात जयसिंगपूरच्या दोन महिला ठार
By admin | Published: September 25, 2016 12:50 AM2016-09-25T00:50:06+5:302016-09-25T00:50:06+5:30
तिघेजण गंभीर : मुलगी पाहून परतताना अपघात
कवठेमहांकाळ : ढालगाव (ता. कवठेमहांकाळ) येथे मुलगी पाहण्यासाठी गेलेल्या दोघी सख्ख्या मावस बहिणींचा जीप-कारच्या धडकेत जागीच मृत्यू झाला. हा अपघात मिरज-पंढरपूर मार्गावर शनिवारी रात्री पावणे नऊ वाजता घडला.
जयसिंगपूर येथील रहिवासी असलेल्या शांताबाई अशोक बनसोडे (वय ४0) व लक्ष्मी बबन कांबळे (४५) या दोन महिला या अपघातात जागीच ठार झाल्या. अन्य तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची कवठेमहांकाळ पोलिसात नोंद झाली आहे.
कांबळे व बनसोडे कुटुंबातील काहीजण ढालगावला मुलगी पाहण्यासाठी गेले होते. मुलगी पाहून जयसिंगपूरकडे परतत असताना मिरज-पंढरपूर राज्यमार्गावर कुचीजवळील महाराजा पॅलेस हॉटेलसमोर त्यांची कार (एमएच 0९ एबी ८८४२)
आली असता, मिरजेहून सोलापूरकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या जीपने (एमएच १३ ए ५९३३) त्यांना समोरासमोर जोरदार धडक दिली. या अपघातात कारचा चक्काचूर झाला. यामध्ये शांताबाई बनसोडे, लक्ष्मी कांबळे या दोन सख्ख्या मावस बहिणींचा जागीच मृत्यू झाला, अन्य तिघे गंभीर जखमी झाले असून, त्यांची नावे समजू शकली नाहीत. (वार्ताहर)