दुचाकी-कार अपघातात दोन कीर्तनकारांचा मृत्यू, कार चालकाविरोधात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2022 07:02 PM2022-04-18T19:02:06+5:302022-04-18T19:04:36+5:30
खटाव तालुक्यातील जाखणगावशेजारील पोवई शिवारात दुचाकी आणि कारच्या अपघातात दोन तरुण कीर्तनकारांचा मृत्यू झाला, तर एक कीर्तनकार गंभीर जखमी झाला.
पुसेगाव : खटाव तालुक्यातील जाखणगावशेजारील पोवई शिवारात दुचाकी आणि कारच्या अपघातात दोन तरुण कीर्तनकारांचा मृत्यू झाला, तर एक कीर्तनकार गंभीर जखमी झाला. कुणाल शंकर जाधव आणि अभिजित मधुकर येलगे हे अपघातात मृत्यू पावले, तर बाबा निवृत्ती जगदाळे जखमी झाले असून त्यांच्यावर सातारा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघाताबाबत संकेत जाधव यांनी फिर्याद दिली. पुसेगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भोसरे (ता. खटाव) येथील कीर्तनकार कुणाल शंकर जाधव (वय २३) हे शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजता त्यांच्या दुचाकीवरून सहकारी कीर्तनकार अभिजित येलगे (३६, रा. देवाची आळंदी) व बाबा निवृत्ती जगदाळे (रा. बोथे, ता. माण) यांना घेऊन पुसेगावच्या दिशेने निघाले होते. औंध-पुसेगाव रोडवरील पोवई माळ परिसरात टाटा सफारी (एमएच १२ जेएन २५००) या चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील तिघेही गंभीर जखमी होऊन रस्त्यावर पडले.
त्याच रस्त्यावरून प्रवास करणारे अक्षय जाधव यांनी जखमींना खासगी आणि शासकीय रुग्णवाहिकेतून पुसेगाव आरोग्य केंद्र आणि जिल्हा शासकीय रुग्णालयात पोहोचविण्याची व्यवस्था केली. रुग्णालयात कीर्तनकार कुणाल जाधव यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे पुसेगाव येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले, तर गंभीर जखमी झालेले देवाची आळंदी येथील कीर्तनकार अभिजित येलगे यांचा जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. बोथे येथील बाबा जगदाळे यांच्यावर साताऱ्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अविचाराने, निष्काळजीपणे रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगाने वाहन चालवत अपघात करून, जखमींना उपचारासाठी घेऊन न जाता पळून जाणे, तसेच मृत्यू आणि गंभीर दुखापतीस कारणीभूत ठरला, म्हणून चारचाकी वाहनाचा चालक जीवन पांडुरंग जाधव (गादेवाडी) याच्याविरोधात पुसेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब लोंढे तपास करत आहेत.