सातारा जिल्ह्यात वेगवेगळ्या अपघातात दोन युवक ठार
By admin | Published: March 27, 2016 12:03 AM2016-03-27T00:03:41+5:302016-03-27T00:16:50+5:30
एक जखमी : नागठाणेजवळ टायर बदलताना ट्रकची धडक
सातारा : जिल्ह्यात दोन ठिकाणी झालेल्या वेगवेगळ्या अपघातांत दोनजण ठार झाले, तर एकजण गंभीर जखमी झाला.
नागठाणे येथील अपघात टायर बदलताना ट्रकने धडक दिल्याने चरण सदाशिव पाटील (वय १९, रा. धामणी, ता. तासगाव) हा युवक ठार झाला, तर पाचगणी येथे दुचाकी घसरून वैभव अरुण कांबळे (१८, आंबेडकर कॉलनी, पाचगणी) या युवकांचा मृत्यू झाला.
सविस्तर वृत्त असे, टेम्पोचालक सूरज अशोक पाटील व चरण पाटील (दोघे रा. धामणी, ता. तासगाव) हे दोघे कोल्हापूरहून पुण्याकडे निघाले होते. शुक्रवारी रात्री त्यांचा टेम्पो नागठाणेजवळ पंक्चर झाला. त्यामुळे टायर बदलण्यासाठी दोघेही खाली उतरले. काही वेळानंतर टायर बदलून झाला. जुना टायर ट्रकमध्ये ठेवण्यासाठी चरण पाटील हा घेऊन जात असताना दुसऱ्या ट्रकने चरण आणि सूरजला जोरदार धडक दिली.
ही धडक इतकी भीषण होती की, चरण पाटील जागीच ठार झाला, तर सूरज गंभीर जखमी झाला. काही नागरिकांनी जखमी सूरजला तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. ज्या ट्रकने धडक दिली. त्या ट्रकचा चालक वैजनाथ कदम (रा. बार्शी, जि. सोलापूर) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. (प्रतिनिधी)
पाचगणीत दुचाकी घसरून तरुणाचा मृत्यू
पाचगणी : वैभव कांबळे हा शुक्रवारी (दि.२५) रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास पाचगणीहून सेंट झेविअर्स हायस्कूलकडे दुचाकीवरून (एमएच ११ बी आर ६६३८) निघाला होता. सेंट झेविअर्स हायस्कूलजवळील वळणावर त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी भिंतीवर आदळली. त्यामुळे त्याच्या डोक्याला जबर मार लागला; मात्र अपघात झाल्याचे कुणालाही न समजल्याने वैभव त्या ठिकाणी बराच वेळ पडून होता. काही वेळानंतर तेथील नागरिकांनी त्याला रुग्णालयात नेले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. वैभवने नुकतीच बारावीची परीक्षा दिली होती.