‘यू-टर्न’ रेल्वेमागावरील प्रवास पाडतोय भुरळ
By admin | Published: April 2, 2015 12:10 AM2015-04-02T00:10:53+5:302015-04-02T00:37:59+5:30
पर्यावरणप्रेमींची मागणी : आदर्की येथील ‘अर्धचंद्राकृती’ रेल्वेमार्गालगत शोभेची झाडे लावल्यास सौंदर्य वाढेल
सूर्यकांत निंबाळकर - आदर्की मिरज-पुणे लोहमार्गावर वाठार स्टेशन-आदर्की रेल्वेस्थानकादरम्यान सोळकीचे टेक येथे रेल्वे गाड्या पूर्णपणे ‘यू-टर्न’ घेतात. हे दृश्य अत्यंत नयनरम्य दिसते. याठिकाणी शासनाने वेगवेगळ्या झाडांची लागवड केल्यास हे ठिकाण एक पर्यटनस्थळ म्हणून उदयाला येईल. शासनस्तरावर यासाठी प्रयत्न व्हावेत, अशी अपेक्षा पर्यावरणप्रेमींमधून होत आहे.
मिरज-पुणे लोहमार्गावर मीटरगेज रेल्वेलाईन सुरळीत चालू ठेवून ब्रॉड गेज रेल्वेलाईनचे काम करताना जुन्या लाईनशेजारून आदर्की खुर्द गावच्या हद्दीत वाठार स्टेशन-आदर्की रेल्वेस्थानकादरम्यान सोळकीचे टोक येथे पुण्यापासून ११० ते १११ किलोमीटर दरम्यान इंग्रजी वर्णाक्षर ‘सी’प्रमाणे वळण असून याठिकाणी रेल्वेगाडी अर्धगोलाकारात वळण घेते. या वळणावर गाडी आल्यानंतर पुढच्या डब्यातील प्रवासी मागील डब्यातील प्रवाशांना पाहू शकतात. हे दृश्य फक्त आदर्की खुर्द येथेच पाहायला मिळते. हा परिसर डोंगराळ असून रेल्वे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ओसाड झाला आहे. या परिसरात रेल्वे प्रशासनाची मोठी मोकळी जागा आहे. याठिकाणी वृक्षलागवड करून खंडाळ्याच्या घाटातील मल्कीहिल रेल्वेस्थानकाप्रमाणे विकास केल्यास प्रवाशांची संख्या वाढू शकते. मिरज-पुणे लोहमार्गाचे दुहेरीकरण होणार आहे. त्यावेळी ‘यू-टर्न’जवळून दुसऱ्या रेल्वेलाईनचे काम करताना मोकळ्या जागेत वृक्षारोपण करण्याची गरज आहे. दुर्लक्षित रेल्वेस्थानक बंद करून बिचुकले वस्ती येथे झाल्यास प्रवाशांची सोय होईल आणि मालवाहतूकही वाढेल.
...तर वेगळी ओळख मिळेल
महाराष्ट्रातील रेल्वेलाईनच्या जाळ्यात आदर्कीसारखा ‘यू-टर्न’ कोठेही नाही. पन्नास वर्षांपूर्वी शंकर नारायण कंपनीने लाखो ब्रास माती, मुरुम, दगड टाकून शंभर फूट उंचीचा भराव तयार केला आणि त्यावन रेल्वेमार्ग काढला आहे. या भरावावर त्यावेळपासून वेडीबाभळ, घायपाताचे साम्राज्य पसरले आहे. दोन किलोमीटर अंतराच्या या मार्गावर फळाफुलांची झाडे लावल्यास प्रवाशांचा ओढा वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.