साताऱ्यात राष्ट्रवादीच्या फ्लेक्सवर उदयनराजे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2018 10:45 PM2018-06-01T22:45:35+5:302018-06-01T22:45:35+5:30
सातारा : राष्ट्रवादीच्या जाहीर कार्यक्रमांच्या पोस्टरवरून गायब झालेली खासदार उदयनराजे भोसले यांची छबी पुन्हा नव्याने झळकू लागली आहे. राष्ट्रवादीच्या येथे झालेल्या युवक मेळाव्याच्या फ्लेक्सवर खासदारांचे छायाचित्र लावण्यात आले होते. उदयनराजेंच्या बाबतीत राष्ट्रवादी नेत्यांचे मनपरिवर्तन झाल्याचीच ही नांदी असल्याची आता चर्चा सुरू झाली आहे.
‘एक बुथ एक युथ,’ असा नारा देत राष्ट्रवादी युवक काँगे्रसच्या वतीने शुक्रवारी युवकांचा मेळावा झाला. या मेळाव्याला ज्येष्ठ नेते आमदार शशिकांत शिंदे, युवकचे अध्यक्ष तेजस शिंदे, सुरेश घुले, युवकचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते-पाटील, जिल्हाध्यक्ष सुनील माने, सारंग पाटील, महिला जिल्हाध्यक्षा समिंद्रा जाधव, प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब महामुलकर, सभापती मिलिंद कदम, राहुल शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
‘उदयनराजे हे राष्ट्रवादीचे खासदार आहेत, ते अजूनही आमच्यासोबतच आहेत,’ असे आमदार शिंदे यांनी नुकतेच पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले होते. राष्ट्रवादीच्या या ‘यूटर्न’मुळे उदयनराजेंबाबत पक्षांतर्गत वातावरण ‘सॉफ्ट’ झाले आहे, असा समज अनेकजण करून घेऊ लागले आहेत. मेळाव्याच्या स्टेजच्या मागे लावलेल्या फ्लेक्सवर सर्व नेत्यांची छायाचित्रे होती, त्यामध्ये उदयनराजेंनाही स्थान मिळाले.
मोदी सरकारच्या निर्णयांमुळे गेल्या तीन वर्षांमध्ये प्रत्येक घरावर संकट कोसळले आहे. राज्य सरकारने सरकारी कर्मचारी भरती करण्याची घोषणा केली; पण ती कशी फसवी होती, हे दोनच दिवसांत उघडकीस आले. पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. तर दुसºया बाजूला उद्योग व्यवसाय अडचणीत सापडले आहेत. या अन्यायाविरोधात मोठे आंदोलन उभे करावे लागणार आहे. आंदोलनात किती कार्यकर्ते येतील, याचा विचार न करता अन्याय दिसेल तिथे आंदोलनास सिद्ध राहावे, असे आवाहनही आ. शिंदे यांनी केले.
मेळाव्याकडे आमदारांची पाठ
राष्ट्रवादी युवकच्या मेळाव्याला आमदार शशिकांत शिंदे हे उपस्थित राहिले. पक्षाच्या इतर आमदारांनी मात्र या मेळाव्याकडे पाठ फिरविली. जिल्हाधिकारी कार्यालयापुढेही युवकचे आंदोलन झाले. त्या आंदोलनातही आमदार मंडळींनी सहभाग नोंदवला नाही. आमदार शिंदे हे मात्र आपल्या पुत्राला पाठबळ देण्यासाठी धडाडीने प्रयत्न करत असल्याचेच यावेळी जाणवले. यापूर्वीही साताºयात युवकचा भव्य मोर्चा काढण्यात आला होता, त्याकडेही आमदार मंडळींनी पाठ फिरवली होती, याबाबत उलट-सुलट चर्चा सुरू होती.