उदयनराजेंच्या जामीन अर्जावर शुक्रवारी सुनावणी
By admin | Published: March 27, 2017 10:38 PM2017-03-27T22:38:28+5:302017-03-27T22:38:28+5:30
शासकीय विश्रामगृहावर बेदम मारहाण केल्याप्रकरणी वैभव राजाराम बोंडरे (वय २६, रा. मुरुम, ता. फलटण) याला सोमवारी अटक करण्यात आली
आॅनलाइन लोकमत
सातारा, दि. 27 - लोणंद येथील सोना अलाईन्स कंपनीचे मालक राजीवकुमार जैन यांना खंडणीसाठी आणि कामगारांच्या पगारासाठी शासकीय विश्रामगृहावर बेदम मारहाण केल्याप्रकरणी वैभव राजाराम बोंडरे (वय २६, रा. मुरुम, ता. फलटण) याला सोमवारी अटक करण्यात आली. त्यामुळे अटक केलेल्यांची संख्या आठ झाली आहे. पोलीस कोठडीत असलेल्या आठ जणांची न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. यामधील मुख्य आरोपी व खासदार उदयनराजे भोसले यांचे पीए अशोक सावंत व रणजित माने हे दोघे प्रकृती अस्वास्थ्यामुळे खासगी रुग्णालयात दाखल असल्याने त्यांना तीन दिवसांची मॅजेस्टिक रिमांड देण्यात आली आहे. शुक्रवार, दि. ३१ रोजी खासदार उदयनराजे भोसले यांच्या जामीन आर्जावर सुनावणी होणार आहे.
सोना अलाईन्स कंपनीचे मालक व व्यवस्थापक राजीवकुमार जैन यांनी दोन महिन्यांचे चार लाख रुपये खंडणी दिली नाही व कामगारांचे पगार केले नाहीत म्हणून रणजित माने व अशोक सावंत यांनी खासदार उदयनराजे यांनी मिटिंगसाठी बोलावले आहे, असा फोन करून जैन व त्यांच्या सहकाऱ्यांना सातारा येथील विश्रामगृहावर बोलावून घेतले होते. यानंतर जैन यांच्या सहकाऱ्यांना कोंडून जैन यांना बेदम मारहाण करण्यात आली होती. याबाबत जैन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उदयनराजेंसह दहा जणांवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
याप्रकरणी ९ जणांना पोलिस कोठडी मिळाली होती. त्यापैकी मुख्य आरोपी रणजित माने याला अर्धांगवायूचा झटका आल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले तर अशोक सावंत याला बीपीचा स्ट्रोक बसल्याने त्याला ही रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यामुळे सोमवारी न्यायालयात हे दोन आरोपी सोडून अन्य सात जणांना हजर करण्यात आले. या सातही जणांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. तर अशोक सावंत व रणजित माने यांना तीन दिवसांची मॅजेस्टीक रिमांड देण्यात आली.