...तर मराठा आरक्षणासाठी उदयनराजे, शिवेंद्रसिंहराजे रस्त्यावर उतरणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2020 12:54 PM2020-09-12T12:54:35+5:302020-09-12T13:02:00+5:30
मराठा आरक्षणाच्याबाबतीत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उच्च न्यायालयात सरकारच्यावतीने ताकदीने बाजू मांडली होती. मात्र सध्याचे सरकार सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडताना कमी पडले आहे. राज्य सरकारने तत्काळ ठोस पावले उचलावीत अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली आहे.
सातारा : मराठा आरक्षणाच्याबाबतीत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उच्च न्यायालयात सरकारच्यावतीने ताकदीने बाजू मांडली होती. मात्र सध्याचे सरकार सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडताना कमी पडले आहे. राज्य सरकारने तत्काळ ठोस पावले उचलावीत अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली आहे.
खा. उदयनराजे यांनी समाजमाध्यमावर आपले मत व्यक्त केले आहे, त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, मराठा समाजाच्या प्रत्येक लढ्यात मी त्यांच्यासोबत आहे. समाजाच्या उन्नतीसाठी आपण प्रयत्नांची शर्थ करु.
या लढ्यात मराठा समाजासोबत मी आहे, हे सरकारने लक्षात ठेवावे. मराठा आरक्षणला स्थगिती दिल्यामुळे समाजाच्या प्रगतीला मोठी खीळ बसली आहे. सरकारने समाजाला विश्वासात घेऊन योग्य ती कार्यवाही केली असती तर मराठा आरक्षण कायम टिकवता आले असते.
आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, ह्यमराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली ही बाब दुर्देवी असून समाजासाठी अन्यायकारक आहे. मराठा आरक्षणासाठी सकल मराठा समाज जे पाऊल उचलेल ते सर्वांना मान्य असेल. राज्य सरकारने स्थगिती उठवण्यासाठी लवकर हालचाल करावी, समाजाच्या निर्णयानुसार आरक्षणासाठी प्रसंगी पुन्हा रस्त्यावर उतरुन आंदोलन करु, असा इशारा आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिला आहे.
तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उच्च न्यायालयात विधेयक टिकवले. सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारने आपली बाजू नीट मांडली नाही, असेच म्हणावे लागेल. दरम्यान, सरकारने गांभीर्याने लक्ष घालून आरक्षणावरील स्थगिती उठवली पाहिजे, ही सकल मराठा समाजाची अपेक्षा आहे. मराठा समाज फार मोठा आहे. या समाजातील असंख्य लोक आर्थिक मागास आहेत.
समाजाच्या अनेक अडचणी आहेत. त्यासाठी आरक्षण आवश्यक आहे. त्यामुळे सकल मराठा समाजाचा जो निर्णय होईल तो मान्य करुन प्रसंगी रस्त्यावर उतरावे लागले तरी उतरु आणि आंदोलन करु, असेही आ. शिवेंद्रसिंहराजे या पत्रकात म्हटले आहे.
जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाचा अंतीम निकाल येत नाही, तोपर्यंत मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या सवलती तसेच नोरकभरतीतले आरक्षण कायम ठेवावे, यासाठी सरकारने तातडीने अद्यादेश काढावा, अन्यथा होणाऱ्या परिणामाला सामोरे जावे.
- उदयनराजे भोसले, खासदार
मराठा समाजाने आरक्षणासाठी लढा उभारला, मोर्चे काढले. एवढं सगळं करुन जर आरक्षणाला स्थगिती मिळत असेल तर खूपच दुर्दैवी बाब आहे. त्यामुळे सरकारने स्थगिती उठवण्यासाठी लवकरात लवकर प्रयत्न करावा.
-शिवेंद्रसिंहराजे भोसले,
आमदार