शिवेंद्रराजेंवरीलही अन्याय खपणार नाही : उदयनराजे भोसले -माणुसकीच्या भावनेतून माझं मत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2018 11:00 PM2018-10-25T23:00:59+5:302018-10-25T23:06:32+5:30
‘ज्या-ज्यावेळी लोकांवर अन्याय होतो, त्या-त्यावेळी माणुसकीच्या भावनेतून मी नेहमी त्या ठिकाणी माझं मत व्यक्त करतो. कोणीही असू द्या, मला अन्याय सहन होत नाही. शिवेंद्रसिंहराजेंवरही अन्याय झाला तरी मी
सातारा : ‘ज्या-ज्यावेळी लोकांवर अन्याय होतो, त्या-त्यावेळी माणुसकीच्या भावनेतून मी नेहमी त्या ठिकाणी माझं मत व्यक्त करतो. कोणीही असू द्या, मला अन्याय सहन होत नाही. शिवेंद्रसिंहराजेंवरही अन्याय झाला तरी मी खपवून घेणार नाही,’ अशी भूमिका खासदार उदयनराजे भोसले यांनी स्पष्ट केली.
साताऱ्यातील दारू दुकान काढण्यावरून वादावादी झाली होती. या पार्श्वभूमीवर खासदार उदयनराजेंनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली.खासदार उदयनराजे म्हणाले, ‘मी जे करतोय ते कर्तव्य म्हणून करत आहे. कारण लोकांवर झालेला अन्याय मला सहन होत नाही. येथे लोकशाही असून, मी तत्त्वांशी बांधील आहे. शिवेंद्रसिंहराजेंवरील अन्यायही मी खपवून घेणार नाही. तरीही प्रत्येकाने विचार करणे महत्त्वाचे आहे. पैशाच्या जोरावर दारूचं दुकान सुरू आहे. तेथे जवळच असणाºया मंडईला महिला येतात. तेथील एक दारू दुकान बंद होण्याने अनेकांचे कल्याण होत असेल तर काय चुकीचं काम करत आहे.’
मला अपेक्षा होती की आमदार या नात्याने माझे धाकटे बंधूराज शिवेंद्रसिंहराजे यांनी त्यांच्या जवळच्या मित्रांना सांगायला पाहिजे होते. यामध्ये मला दोषी पकडत असाल तर मी खऱ्या अर्थाने माझा दोष स्वीकारतो; पण मी अन्याय सहन करणार नाही, असेही उदयनराजेंनी स्पष्ट केले. तसेच प्रसारमाध्यमांनी अन्यायाच्या विरोधात भूमिका घ्यावी, असे आवाहनही यावेळी उदयनराजे भोसले यांनी यावेळी केले.
परत मीच आहे, हे लक्षात ठेवा
मी निवांत घरी बसून राहू शकतो, एसी गाडीत फिरू शकतो. मात्र अन्याय माझ्या मनात रुततो. अन्याय झाला तर वाटेल त्या परिस्थितीत सहन करणार नाही. पक्ष कुठलाही असू दे, मला अन्याय सहन होत नाही. मात्र तुमच्यावर वेळ येईल, तेव्हा मीच तुमच्या पाठीशी असणार आहे. तुमचा भाऊ म्हणून...आई-वडिलांचा मुलगा म्हणून मीच असणार आहे, एवढं लक्षात ठेवा, असे उदयनराजेंनी स्पष्ट केले.
दारूमुळं कुटुंबं उद्ध्वस्त होतात : उदयनराजे
जागा नसताना पैशांच्या जोरावरती दारूचं दुकान चालू ठेवलंय. माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका, जाऊन बघा. या ठिकाणी मंडईला महिला येतात. दारूच्या व्यसनामुळं कुटुंबं उद्ध्वस्त होतात. एवढी काय मोगलाई लागलीय हो, एखादं दारूचं दुकान निघाल्याने कल्याण होत असेल तर काय चुकीचं आहे. ‘फॅक्ट इज फॅक्ट’ दारूचं दुकान बंदच झालं पाहिजे, असेही उदयनराजेंनी स्पष्ट केले.
खासदारांनी माझ्या अन्यायाबाबत काळजी करू नये : शिवेंद्रसिंहराजे
सातारा : ‘देशी दारू दुकान बंद करण्याचा मुद्दा नसून खासदार उदयनराजे हे सुपारी घेऊनच जागा खाली करण्यासाठी आले होते,’ असा दावा आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केला. तसेच त्यांनी माझ्यावरील अन्यायाची काळजी करू नये, अन्याय झाला तर मी कधीही शांत बसत नाही, हेही खासदारांनी लक्षात ठेवावे, अशी कोपरखळीही शिवेंद्रसिंहराजेंनी मारली.
साताऱ्यातील देशी दारू दुकानाबद्दल झालेल्या वादानंतर खासदार उदयनराजे भोसले यांनी ‘शिवेंद्रसिंहराजेंवरही अन्याय झाला तर मी खपवून घेणार नाही,’ असे वक्तव्य केले होते. त्याला प्रसारमाध्यमांशी बोलताना आ. शिवेंद्रसिंहराजेंनी प्रत्युत्तर दिले.
आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ‘साताºयातील देशी दारू दुकान बंद करायचा विषय नव्हता. तर तेथील जागा खाली करण्याचा होता. त्यांचा हा नियोजित प्लॅन होता. देशी दारू दुकाने बंद करायची असतील तर त्यांनी आपल्या मतदारसंघातील सर्व दारू दुकाने बंद करावीत. तसेच पोलीस व आम्ही तेथे आल्यानेच त्यांचा हा डाव यशस्वी झाला नाही. मतदारसंघात अनेक प्रश्न आहेत. दुष्काळ पडला आहे, त्याकडेही खासदारांनी लक्ष दिले तर बरं होईल.’त्यांना जागा खाली करायची होती. या ठिकाणी पेढ्याचे दुकान असते तर खासदारांनी तेही खाली करण्याची भूमिका घेतली असती, असेही आ. शिवेंद्रसिंहराजेंनी स्पष्ट केले.