Maharashtra Election 2019 : 'मी काय बांगड्या भरल्या नाहीत', टीकाकारांना उदयनराजेंनी ठणकावले
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2019 04:06 PM2019-09-24T16:06:51+5:302019-09-24T16:07:23+5:30
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 : साताऱ्यातील भाजपा नेते आणि माजी खासदार उदयनराजे भोसलेंना आज पवारांचं नाव घेताना अश्रू अनावर झाले होते.
सातारा - राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपात प्रवेश केलेले उदयनराजे भोसले आता पोटनिवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत. विधानसभा निवडणुकांसोबतचसातारा लोकसभेचीही पोटनिवडणूक होईल. तर, 24 ऑक्टोबरला या जागेसाठी मतमोजणी होणार असल्याने उदयनराजेंना दिलासा मिळाला आहे. मात्र, जर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हेच निवडणुकीच्या मैदानात उतरणार असतील, तर मी निवडणुकीतून माघार घेईल, असे उदयनराजेंनी म्हटले. यावेळी, बोलताना उदयनराजे भावुक झाले होते. उदयनराजेंना आदराची भावना व्यक्त करत, टीका करणाऱ्यांनाही धारेवर घेतले.
साताऱ्यातील भाजपा नेते आणि माजी खासदार उदयनराजे भोसलेंना आज पवारांचं नाव घेताना अश्रू अनावर झाले होते. आज महाळ आहेत, अस सांगताना पवारसाहेब मला पितृतुल्य असल्याचं ते म्हणाले. तसेच, मी लोकशाही मानणारा आहे, माझ्यावर अनेकांनी तोंडसुख घेतलं, काहीही बोलायचंय ते बोलले. मी उगीच इकडं तिकडं गेलो नाही. हसू का रडू तेच मला कळत नाही. आपण एकमेकांचा हात धरू शकतो, पण.... त्यांना योग्य वाटलं ते ते बोलले. मानसिक समाधान झालं असेल, नसेल तर अजून बोला. कुणी काय केलं, याचा लेखाजोखा लोकांपुढ मांडतो. मी आतापर्यंत समाजकारण केलं, राजकारण कधीही केलं नाही.
मी आदराने बोलतो, खूप आदर आहे मला त्यांचा. नवाब मलिक हेही बोलले. त्यांच्याबद्दलही आदर आहे. पण, कधीतरी अंतर्मनात झाकून बघा. मी स्वाभिमान सोडलेला नाही, कुणीपण कायपण बोलायचं. मी ऐकून घ्यायचं. एवढ्या काय मी बांगड्या भरल्या नाहीत. हिंमत असेल तर चॅलेंज घ्या, कुणीपण या समोरासमोर बसा ! असे म्हणत उदयनराजेंनी टीकाकारांचा समावेश घेतला.
कॉलर उडवण्याच्या संदर्भातील व्यक्तव्यावरुनही त्यांनी शिवसेनेला नाव न घेता टोला लगावला. ''मला गाणे आवडते मी लावतो, कॉलर माझीय, चावीन नाहीतर फाडून टाकीन. दुसऱ्याला काय, त्याच्यावरही चर्चा. इश्यूबेस राजकारण करू नका, इश्यूबेस समाजकारण करा'', असे म्हणत सामनातील अग्रलेखावरुन शिवसेनेला टोला लगावला.