चुकीच्या पद्धतीने काम केल्यास कदापि खपवून घेणार नाही- उदयनराजे भोसले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 11:58 PM2018-07-23T23:58:36+5:302018-07-24T00:00:28+5:30
सातारा : सातारा विकास आघाडीत सुरू असलेली अंतर्गत धुसफूस समोर आल्यानंतर दस्तुरखुद्द खासदार उदयनराजे भोसले यांनाच आघाडीच्या दोन्ही गटांची नाराजी दूर करावी लागली. सोमवारी जलमंदिर पॅलेस येथे झालेल्या बैठकीत उदयनराजे भोसले यांनी सर्वांचीच कानउघडणी केली. चुकीच्या पद्धतीने कोणी काम केल्यास खपवून घेणार नाही, असा इशाराही उदयनराजे यांनी दिला.
पालिकेतील सत्तारूढ सातारा विकास आघाडीत गेल्या काही दिवसांपासून कोणत्या न कोणत्या कारणाने धुसफूस सुरू आहे. गटनेत्या स्मिता घोडके व नगराध्यक्षा माधवी कदम यांच्यात दोन गट पडल्याने हा विषय चर्चेला ठरला आहे. रविवारी आघाडीतील दोन्ही गटांची बाजू खासदार उदयनराजे भोसले यांनी ऐकून घेतली होती. यावेळी स्मिता घोडके यांनी नगराध्यक्षा चुकीच्या पद्धतीने कशा वागतात, हे उदयनराजेंसमोर मांडले होते. तर नगराध्यक्षांनी आपली बाजू ठामपणे मांडली होती.
दरम्यान, दोन्ही गटांच्या नगरसेवकांना फटकारत उदयनराजे भोसले यांनी सोमवारी सकाळी जलमंदिर येथे दोन्ही नाराज गटांची बैठक बोलविली. या बैठकीत नगराध्यक्षा माधवी कदम व स्मिता घोडके यांच्या बाजूने नगरसेवकांनी उदयनराजे यांच्यासमोर आपापली मते मांडली. यावेळी नगराध्यक्षांच्या बाजूने नगरसेवकांची संख्या अधिक असल्याने त्यांचे पारडे जड होते.
नगराध्यक्षांची बाजू मांडताना महिला नगरसेविका म्हणाल्या, ‘आमचा कोणताही गट नाही. जनतेने निवडून दिल्याने त्यांच्याच कामांची चर्चा करण्यासाठी आम्ही नगराध्यक्षांच्या दालनात बसतो. आम्हाला स्वतंत्र दालन नाही. याचा वेगळा अर्थ काढला जातो. ‘नगराध्यक्षांचा बंदोबस्त करा’ म्हणजे नक्की काय करा? असा प्रश्नही यावेळी त्यांनी उपस्थित केला. दोन्ही गटांची बाजू ऐकून घेतल्यानंतर खासदार उदयनराजे भोसले यांनी सर्वांनी पारदर्शी काम करावे, चुकीच्या कोणत्याच गोष्टी यापुढे खपवून घेतल्या जाणार नाहीत, असा इशारा बैठकीत दिला.
पदाचा मान राखा...
आघाडीतील प्रत्येकाला पदे देण्यात आली आहे. या पदाचा मान राखून सर्वांनी शहराच्या विकासाला साजेसे काम करावे, असे यावेळी उदयनराजे भोसले म्हणाले. दरम्यान, सुमारे दीड तास झालेल्या या चर्चेनंतर नगराध्यक्षा माधवी कदम व स्मिता घोडके यांनी यापुढे एकमेकांना समजावून घेऊन व विचारविनिमय करून काम केले जाईल, अशी ग्वाही उदयनराजे भोसले यांना दिली.