उदयनराजेंकडून प्रतिसाद नाही : शिवेंद्रसिंहराजे

By Admin | Published: October 25, 2016 11:07 PM2016-10-25T23:07:20+5:302016-10-26T00:18:16+5:30

रात्री उशिरा अदालत वाड्यात भेट : ‘शिवाजीराजेंनी बोलविले म्हणून आलो... हं, बोला... काय?’ उदयनराजेंच्या प्रश्नानंतर पुढे चर्चाच नाही--चर्चेतला वॉर्ड--पालिका धुमशान

Udayan Raje does not respond: Shivendra Singh | उदयनराजेंकडून प्रतिसाद नाही : शिवेंद्रसिंहराजे

उदयनराजेंकडून प्रतिसाद नाही : शिवेंद्रसिंहराजे

googlenewsNext

सातारा : ‘खासदारांना दोन वेळा निरोप दिला, तरीही त्यांच्याकडून काहीच रिप्लाय नाही. चर्चाच घडली नाही तर निर्णय कसा होणार? माझ्याकडेही इच्छुकांकडून मागणी आहे. इतके दिवस थांबलो, आणखी किती थांबणार,’ अशा शब्दात नगरविकास आघाडीचे अध्यक्ष आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी ‘लोकमत’शी बोलताना आपली भावना व्यक्त केली. दरम्यान, मंगळवारी रात्री उशिरा अदालत वाड्यात दोन्ही राजेंची भेट झाल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र, या ठिकाणीही कोणताच निर्णय न होता बैठक संपली. बुधवारी पुन्हा एकदा या दोघांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
खासदार उदयनराजेंशी आमदार शिवेंद्रसिंहराजेंची चर्चा व्हावी, यासाठी शिवाजीराजे भोसले यांनी अदालत वाड्यावर दोघांना बोलविले होते. या ठिकाणी बैठकीत चर्चेला सुरुवात होईल, अशी सर्वांना आशा होती. मात्र, या ठिकाणी आल्यानंतर ‘हं, बोला... काय? केवळ शिवाजीराजेंनी बोलविले म्हणून आलो,’ असे उदयनराजेंनी सांगताच शांतता पसरली. त्यानंतर कोणतीच चर्चा न होता दोन्हीही राजे बाहेर पडले.
या दोन्ही राजेंची बैठक घेण्यासाठी अनेकदा पुढाकार घेतला गेला. मात्र त्याबाबत निर्णय होत नाही. खासदारांकडून कसलाच ‘रिस्पॉन्स’ मिळत नाही. त्यामुळे लढाईआधी तह होण्याची शक्यता कमीच असल्याचे शहरात चित्र तयार झाले आहे.
दहा वर्षांची मनोमिलनाची हुकूमत पणाला लागली आहे. सलग एक दशक सत्तेचा एकत्रित उपभोग घेणाऱ्या साविआ व नविआ या आघाड्यांमध्ये दहा वर्षांपूर्वीइतकीच अस्वस्थता पाहायला मिळत आहे. दोन दिवसांत दोन्ही आघाड्यांच्या मनोमिलनाबाबत निर्णायक तोडगा निघाला नाही तर काडीमोड होऊन काट्याची टक्कर पाहायला मिळण्याची शक्यता सध्याच्या चित्रावरून स्पष्ट होत आहे.
शहरासह तालुक्यात खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मनोमिलनाची सत्ता आहे. शहरातील मनोमिलनाचे बंध पालिका निवडणुकीच्या निमित्ताने ताणले गेले आहेत. निवडणुकीच्या निमित्ताने युद्धापूर्वीची शांतता पसरली आहे. कधीही समरांगण पेटण्याची शक्यता आहे. या समरांगणात लढाईची तयारी अनेकांनी दाखवली आहे. मनोमिलनानंतर ४० जणांना संतुष्ट करण्याच्या नादात जवळचे कार्यकर्ते नाराज होतात. सत्तेसाठी मनोमिलन फायद्याचे असले तरी यामुळे अनेक कार्यकर्ते बाजूला फेकले जातात, हे वास्तव आहे.
विद्यमान व माजी नगरसेवकांसह कार्यकर्ते साविआ अथवा नविआ या आघाड्यांकडून इच्छुक आहेत. उमेदवारी मिळावी, यासाठी अनेकांनी दोन्ही राजेंकडे उमेदवारी मागितली आहे. जलमंदिर व सुरुची या दोन्ही वाड्यांवर कार्यकर्त्यांची रेलचेल सुरूच आहे. प्रत्येकाला निवडून येण्याची खात्री आहे. त्यामुळे इच्छुकांची संख्या वाढत आहे. (प्रतिनिधी)


दोन बडेकरांच्या संघर्षात तिसरेच नाव ?
वॉर्ड क्रमांक सातमध्ये विद्यमान नगराध्यक्षविजय बडेकर यांना सातारा विकास आघाडीकडून पुन्हा उमेदवारी मिळणार आहे. तर याच वॉर्डातून नगर विकास आघाडीकडून निवडणूक लढविण्यास प्रकाश बडेकरही हे इच्छुक आहेत. या वॉर्डामध्ये काटे की टक्कर होणार आहे. गत वर्षी प्रकाश बडेकर हे अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात होते. तर याच वॉर्डमध्ये नगर विकास आघाडीकडून संतोष शिंदे आणि सोनिया शिंदेही इच्छुक आहेत. दरम्यान, शिवेंद्रसिंहराजे यांचे कट्टर समर्थक विनोद ऊर्फ बाळू खंदारे यांनीही प्रचाराची जोरदार आघाडी उघडली आहे. कदाचित दोन बडेकरांच्या संघर्षात तिसरेच नाव शेवटच्या क्षणी ओपन होऊ शकते.


मी चर्चेसाठी सातारा विकास आघाडीच्या पक्षप्रतोदांजवळ खासदारांना दोन वेळा निरोप दिला होता, मात्र त्यांच्याकडून त्याबाबत काहीच ‘रिप्लाय’ नाही. आमच्या नगरविकास आघाडीकडून लढण्यासाठी अनेकजण इच्छुक आहेत. आमच्या मंडळींच्याही अपेक्षा आहेत. मी तरी किती दिवस थांबणार?
- आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले,

Web Title: Udayan Raje does not respond: Shivendra Singh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.