उदयनराजेंना दिलेला शब्द भाजपा पाळणार, खासदारकीसोबत 'खास' जबाबदारीही सोपवणार!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2019 12:27 PM2019-11-21T12:27:06+5:302019-11-21T12:32:28+5:30
Maharashtra News : माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी काही दिवसांपूर्वीच या बाबतचे सूतोवाच केले होते.
मुंबई : विधानसभा निवडणुकीसोबतच सातारा लोकसभेची पोटनिवडणूक घेण्यात आली. मात्र, अवघ्या 4 महिन्यांत खासदारकीचा राजीनामा देऊन पुन्हा निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या उदयनराजेंना पराभव पत्करावा लागला. उदयनराजेंनी भाजपात प्रवेश केला होता. आता उदयनराजेंच्या पुनर्वसनाची तयारी सुरू करण्यात आली आहे.
भाजपाने उदयनराजेंना थेट केंद्रात मंत्रिपदच देऊ केल्याचे समजते. माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी काही दिवसांपूर्वीच या बाबतचे सूतोवाच केले होते. खासदार उदयनराजे भोसले यांना राज्यात महत्वाचे पद किंवा राज्यसभेत पुनर्वसन करण्यासंदर्भात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली असल्याचे त्यांनी सांगितले होते. यामुळे सध्याच्या राजकीय घडामोडींनुसार राज्यात पद मिळाले नाही तर राज्यसभेचे सदस्यत्व उदयनराजेंना मिळण्याची शक्यता आहे, असे ते म्हणाले होते.
उदयनराजेंना भाजपा राज्यसभेवर घेणार असून कॅबिनेट मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. उदयनराजेंवर अन्याय होणार नाही, पक्ष योग्य सन्मान करेल असे वक्तव्य भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले होते. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे देखिल राज्यसभा खासदार आहेत.
काही दिवसांपूर्वी उदयन राजेंना पत्रकारांनी सरकार कोणाचे स्थापन होणार असा प्रश्न विचारला होता. त्यावर त्यांनी इथं माझचं मला पडलंय, तुम्ही मलाच विचारा कोणाचे सरकार येणार आणि मला काय वाटते? अशी प्रतिक्रिया त्यांनी माध्यमांना दिली. तसेच रामदास आठवले म्हणतायेत ते बरं आहे. युतीचा तिढा सुटेपर्यंत त्यांनाच मुख्यमंत्री करा असंही त्यांनी सांगितले. मात्र थोडी ताणाताणी होईल पण सरकार लवकर स्थापन होईल, असेही म्हटले होते.