निमंत्रण पत्रिका देण्यासाठी उदयनराजे सुरुचीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:58 AM2021-02-23T04:58:26+5:302021-02-23T04:58:26+5:30
सातारा : नाशिक येथील नातेवाईकांच्या लग्नसोहळ्याची निमंत्रण पत्रिका घेऊन खासदार उदयनराजे भोसले हे सोमवारी सुरुचीवर दाखल झाले. आपले बंधू ...
सातारा : नाशिक येथील नातेवाईकांच्या लग्नसोहळ्याची निमंत्रण पत्रिका घेऊन खासदार उदयनराजे भोसले हे सोमवारी सुरुचीवर दाखल झाले. आपले बंधू आमदार शिवेंद्रसिंहराजे यांना त्यांनी लग्नाचे आमंत्रण दिले.
उदयनराजे आणि शिवेंद्रराजे हे दोघेही बंधू सातारा शहरातील शुक्रवार पेठेत राहतात. उदयनराजेंचे जलमंदिर, तर शिवेंद्रराजे यांचे सुरुची ही प्रशस्त निवासस्थाने आहेत. दोन्ही निवासस्थाने हाकेच्या अंतरावर आहेत. जलमंदिर येथून सकाळी अकरा वाजता उदयनराजे आपल्या कारमधून बाहेर पडले. गाडी मोती चौकाकडे जाण्याऐवजी डावीकडे सुरुची बंगल्याकडे वळली. सुरुचीच्या प्रवेशद्वारातून थेट सुरुचीच्या पोर्चमध्ये गाडी पोहोचली. याठिकाणी कार्यकर्त्यांच्या गराड्यात थांबलेले आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उदयनराजे यांचे स्वागत केले. नाशिक येथील एका नातेवाईकांच्या विवाह सोहळ्याची निमंत्रण पत्रिका उदयनराजे यांनी त्यांना दिली. दोघांमध्ये थोडा वेळ चर्चा झाली. सुरुची बंगल्याच्या पोर्चमध्ये उभे राहून दोघांनी एकमेकांची विचारपूस केली. तसेच लग्नाला नक्की यायचं, असेही त्यांनी सांगितले, त्यानंतर उदयनराजे कारमधून निघून गेले.
उदयनराजे आणि शिवेंद्रराजे हे दोघेही भारतीय जनता पक्षामध्ये गेल्यानंतर त्यांच्यामध्ये जाहीरपणे चर्चा झालेली पाहायला मिळाली नव्हती. विशेष म्हणजे पक्षाने आयोजित केलेल्या कार्यक्रमांमध्ये दोघांपैकी एकच नेता उपस्थित राहिलेला पाहायला मिळत होता. मधल्या काळात विधानसभेची आणि त्यांच्यासोबत लोकसभेची पोटनिवडणूक देखील झाली. मात्र या दोघांनी एकत्रितपणे प्रचार केला नाही. त्यातच वर्षभरापूर्वी दोघांच्या कार्यकर्त्यांमध्ये सुरुचीच्या बाहेर जोरदार रणकंदन झाले होते. आगामी नगरपालिका निवडणुकीत देखील दोघे एकत्र येतील, अशी शक्यता नाही. मात्र उदयनराजे सुरुचीवर दाखल झाल्याने व दोघा भावांमध्ये चर्चा झाल्याने तणाव निवळल्याचे चित्र आहे. एकमेकांमधील अबोला त्यांनी सोडला असल्याने आगामी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत याचे पडसाद उमटतात का? याबाबत उत्सुकता लागलेली आहे.