उदयनराजे हे तर सगळ्याच पक्षांचे नेते : शशिकांत शिंदे
By admin | Published: January 25, 2016 12:54 AM2016-01-25T00:54:24+5:302016-01-25T00:54:24+5:30
गोरेंची स्टंटबाजी : झेडपीतील बंडखोरांना प्रसंगी पक्षातून बाहेर काढू
सातारा : ‘खासदार उदयनराजे हे जिल्ह्याचे खासदार आहेत. त्याचबरोबर ते सगळ्याच पक्षांचे नेते आहेत,’ असा टोला आमदार शशिकांत शिंदे यांनी लगावला. आमदार गोरे यांनी जिल्हा बँकेच्या विरोधात उपोषण केल्यानंतर उदयनराजे यांनी त्यांची भेट घेतली होती. या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना शिंदे यांनी वरील वक्तव्य केले. दरम्यान, आमदार जयकुमार गोरे यांचे आंदोलन म्हणजे राजकीय स्टंटबाजी असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.
दरम्यान, जिल्हा परिषदेतील बंडखोरांनी नेत्यांचा आदेश मानला नाही तर त्यांना पक्षातून बाहेर काढले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
येथील राष्ट्रवादी भवनामध्ये जनता दरबार संपल्यानंतर आमदार शशिकांत शिंदे हे पत्रकारांशी बोलत होते. आ. शिंदे म्हणाले, ‘जिल्हा बँकेच्या आंदोलनाचा विषय आमच्यासाठी संपल्यातच जमा आहे. यावर चर्चा करून महत्त्व कोणाला द्यायचे नाही. परंतु गोरेंनी केलेले आंदोलन म्हणजे एक राजकीय स्टंट होता. त्यांना स्टंटबाजीसाठी राजकीय मैदाने मोकळी आहेत. बँकेच्या विश्वासार्हतेला तडा जाऊ नये म्हणून आमचा प्रयत्न होता. त्यामुळे आंदोलन करण्यापूर्वी त्यांच्याशी मी चर्चा केली होती; परंतु त्यांना उपोषण करायचेच होते. त्यातून त्यांचा हेतू काय होता, हे स्पष्ट आहे.
जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी मुदत वाढवून मिळाली नाही तर पदाचा आणि पक्षाचाही राजीनामा देईन, अशी तंबी दिली आहे. यावर पक्षाची भूमिका काय? असा प्रश्न आमदार शिंदे यांना विचारण्यात आला. आ. शिंदे म्हणाले, ‘पाचपैकी चार जणांनी राजीनामा दिला आहे. मात्र दोन पदाधिकाऱ्यांनी मुदत वाढवून मागितली आहे. परंतु त्यांना आम्ही खुलासा मागवून तत्काळ राजीनामा द्या, असे सांगितले आहे. त्यातूनही त्यांनी ऐकले नाही तर त्यांना पक्षातून बाजूला केले जाईल,’ असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
महिला पदाधिकाऱ्यांच्या मारामारी प्रकरणावर ते म्हणाले, ‘पक्ष कार्यालयात बेशिस्तपणा चालणार नाही. या ठिकाणी जनतेचा राबता असतो. पक्षाची शिस्त मोडणाऱ्या महिला पदाधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. राष्ट्रवादीमध्ये बेशिस्तपणा चालत नाही. कार्यकर्त्यांनी शिस्त बाळगावी,’ असे आवाहनही त्यांनी केले. (प्रतिनिधी)