उदयनराजेंना मंत्रिपदासाठी बोलावणेच नाही..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:26 AM2021-07-08T04:26:23+5:302021-07-08T04:26:23+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : भारतीय जनता पक्षाचे राज्यसभेतील खासदार उदयनराजे भोसले यांना केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये संधी मिळेल, ...

Udayan Raje should not be called for ministerial post ..! | उदयनराजेंना मंत्रिपदासाठी बोलावणेच नाही..!

उदयनराजेंना मंत्रिपदासाठी बोलावणेच नाही..!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : भारतीय जनता पक्षाचे राज्यसभेतील खासदार उदयनराजे भोसले यांना केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये संधी मिळेल, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांना होती. मात्र मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली होऊनदेखील उदयनराजेंना मंत्रिमंडळात स्थान मिळाले नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे.

खासदार उदयनराजे भोसले हे सातारा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या माध्यमातून दोन वेळा लोकसभेवर निवडून गेले होते. राष्ट्रवादीत कोंडमारा होत असल्याचे कारणे देऊन त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत सातारा येथे जाहीर सभेमध्ये उदयनराजेंनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. राजीनाम्यानंतर भाजपच्या तिकिटावर त्यांनी लोकसभेची निवडणूक देखील लढली, मात्र त्यात त्यांना अपयश आले होते.

भाजपमध्ये प्रवेश करण्याआधी राज्यातील वरिष्ठ नेत्यांनी त्यांना केंद्रात मंत्रिपद देण्याचा शब्द दिला होता. उदयनराजे यांना राज्यसभेवर घेऊन यातील काही अंशी शब्द पाळण्यात आला. राज्यसभा दिले म्हटल्यानंतर केंद्रात मंत्रिपददेखील मिळणार याची खात्री उदयनराजेंचे कार्यकर्ते व्यक्त करत होते. शिवसेनेचे अरविंद सावंत यांच्या मंत्रिपदाच्या रिक्त जागेवर उदयनराजे यांना संधी मिळेल, अशी चर्चादेखील मधल्या काळात रंगली होती; परंतु तसे झाले नाही. आता मंत्रिमंडळ विस्तारात देखील उदयनराजेंना डावलण्यात आले आहे.

दरम्यान, केंद्रात मंत्रिपद मिळावे, अशी उदयनराजेंनी स्वतःहून मोदी किंवा भाजपमधील वरिष्ठ नेत्यांकडे मागणी केली नव्हती. ते त्यांच्या स्वभावातदेखील नाही, असे मत त्यांचे निकटवर्ती कार्यकर्ते व्यक्त करत आहेत. उदयनराजे हे छत्रपतींचे वारस आहेत. तसेच त्यांनी लोकसभेच्या खासदारकीचा त्याग करून भाजपमध्ये प्रवेश केला होता, त्यामुळे त्यांच्या योगदानाला भाजपने विसरायला नको होते, असा मतप्रवाह देखील कार्यकर्त्यांमध्ये आहे.

भाजपने संधी दवडली?

सातारा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला आहे. प्रदीर्घ काळानंतर विरोधात बसलेल्या राष्ट्रवादीला राज्यात सत्तेत स्थान मिळाले आहे. त्यानंतर राष्ट्रवादीने सातारा जिल्ह्यात आपली पाळेमुळे घट्ट करण्याचे काम केले आहे. शिवसेनेने देखील सातारा जिल्ह्याला मंत्रिपद दिले. या दोन्ही पक्षांनी जिल्ह्यावर पकड मिळवण्यासाठी हालचाली केल्या. राष्ट्रवादी सोडून आलेल्या उदयनराजे यांना जर केंद्रात मंत्रिपद दिले असते तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपला फायदा उठवता आला असता, ही संधी भाजपने दवडली, अशी चर्चा सुरू आहे.

उदयनराजे पुण्यात..

खासदार उदयनराजे भोसले हे सध्या पुण्यात आहेत. १२ जुलैच्या दरम्यान ते दिल्लीला जाणार आहेत. मंत्रिमंडळ विस्ताराच्या बातम्यांवर ते नजर ठेवून आहेत. दिल्लीत गेल्यावर ते आपले मत व्यक्त करणार आहेत, असे निकटवर्ती कार्यकर्त्यांने सांगितले.

Web Title: Udayan Raje should not be called for ministerial post ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.