सातारचा पठ्या ऑलिम्पिक गाजवणार, उदयनराजेंनी भूमिपुत्राला दिल्या शुभेच्छा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2021 12:55 PM2021-06-28T12:55:35+5:302021-06-28T12:56:29+5:30
प्रवीण जाधव हा मुळचा फलटण तालुक्यातील सरडे गावचा रहिवासी असून त्याचे प्राथमिक शिक्षण गावातीलच जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत झाले. त्याच्याकडील कौशल्य ओळखून शिक्षकांनी त्याला खेळासाठी प्रवृत्त केले.
सातारा - सातारचा सुपुत्र प्रविण जाधव टोकियो ऑलिंपिक तिरंदाजी स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. टोकियो ऑलिंपिक स्पर्धेतील तिरंदाजी संघात भारतीय संघातर्फे प्रविणची निवड झाल्याबद्दल खासदार उदयनराजे भोसले यांनी सोशल मीडियातून प्रविणचं कौतुक करत त्यास शुभेच्छा दिल्या. तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही प्रवीणच्या संघर्षमय प्रवासाबद्दल त्याचं अभिनंदन केले. तसेच, प्रविणचा संघर्ष युवकांसाठी प्रेरणादायी असल्याचंही मोदींनी म्हटलं आहे.
प्रवीण जाधव हा मुळचा फलटण तालुक्यातील सरडे गावचा रहिवासी असून त्याचे प्राथमिक शिक्षण गावातीलच जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत झाले. त्याच्याकडील कौशल्य ओळखून शिक्षकांनी त्याला खेळासाठी प्रवृत्त केले. नेमबाजीतील कौशल्यावर त्याची 2015 साली आंतरराष्ट्रीय ज्युनिअर कँपसाठी निवड झाली. त्यातूनच पुढे 2016 च्या आर्चरीच्या वर्ल्डकप स्पर्धेसाठी भारतीय वरिष्ठ संघात प्रवीणला संधी मिळाली होती. भारताच्या या नेमबाज खेळाडूला महाराष्ट्र शासनाच्या वतीने 2017-18 सालचा महाराष्ट्र राज्य क्रीडा क्षेत्रातील मानाचा "शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार" देऊनही गौरविण्यात आले आहे.
सातारचा सुपुत्र प्रविण जाधव याची टोकियो ऑलिंपिक भारतीय तिरंदाजी संघात निवड झाली याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन. "शिवछत्रपती पुरस्कार" विजेता सातारचा हा पठ्ठ्या या स्पर्धेत देखील आपल्या दैदीप्यमान कामगिरीने देशाबरोबरच साताऱ्याचे नाव देखील जगभरात अभिमानाने उंचावेल, यात शंका नाही. pic.twitter.com/0f5Y6r4wwh
— Chhatrapati Udayanraje Bhonsle (@Chh_Udayanraje) June 28, 2021
सातारचा हा पठ्ठ्या ऑलिंपिक स्पर्धेत देखील आपल्या दैदीप्यमान कामगिरीने भारतासह सातारा जिल्ह्याचे नाव देखील जगभरात अभिमानाने उंचावेल, यात शंका नाही. सातारच्या या सुपुत्राचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा, असे उदयनराजे यांनी म्हटलं आहे.
मोदींनीही केलं कौतुक
भारताचा उत्कृष्ट तिरंदाज प्रवीण जाधव यांनी बिकट स्थितीवर मात करून क्रीडाकौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातल्या एका गावाचा रहिवासी असलेल्या प्रवीण याचे आईवडील मजुरी करून घर चालवितात. कष्टकऱ्याचा मुलगा भारतातर्फे ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणार आहे, ही केवळ प्रवीण जाधव यांच्या आईवडिलांसाठीच नव्हे तर प्रत्येक देशवासीयासाठी अभिमानाची गोष्ट आहे, असा गौरव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. ऑलिम्पिकसाठी जाणाऱ्या भारतीय खेळाडूंपैकी अनेकांचे जीवन सर्वांसाठी प्रेरणादायी आहे, असे नरेंद्र मोदींनी मन की बात या कार्यक्रमात सांगितले.