लोणंद एमआयडीसीत उदयनराजेंना मज्जाव !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2017 11:43 PM2017-08-02T23:43:11+5:302017-08-02T23:43:11+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : ‘खंडणी आणि हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी एक दिवसाआड पोलीस ठाण्यात लावण्यात येणारी खासदार उदयनराजेंची हजेरी अखेर न्यायालयाने रद्द केली असून, त्यांचा जामीनही कायम केला आहे. मात्र, लोणंद एमआयडीसी परिसरात न्यायालयाच्या परवानगीशिवाय जाऊ नये, ही नव्याने अट त्यांना घालण्यात आली आहे.
लोणंद येथील सोना अलाईज कंपनीचे व्यवस्थापक राजीवकुमार जैन यांना खंडणी अन् त्यांच्या हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून खासदार उदयनराजेंसह १४ जणांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर उदयनराजे तब्बल तीन महिन्यांनी स्वत:हून सातारा शहर पोलिस ठाण्यात हजर झाले होते तेव्हा न्यायालयाने एक दिवसाआड हजेरी लावण्याच्या अटीवर २ आॅगस्टपर्यंत तात्पुरता जामीन मंजूर केला होता. दरम्यान, उदयनराजेंच्या जामीन अर्जावर बुधवारी सुनावणी होणार असल्याने पोलिसांनी सातारा शहरात सकाळपासून कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता. दुपारी तीन वाजता सुनावणीस सुरुवात झाली.
‘पोलिसांचा तपास पूर्ण झाला असून, आता उदयनराजेंच्या हजेरीची गरज नाही. पूर्वी जो जामीन दिला आहे तो कायम करावा,’ असा युक्तिवाद उदयनराजेंचे वकील धैर्यशील पाटील आणि अॅड. ताहेर मणेर यांनी केला. सरकारी वकिलांनीही जवळपास तशीच भूमिका घेतली. युक्तिवाद ऐकून झाल्यानंतर न्यायाधीशांनी यावर सायंकाळी साडेपाच वाजता निर्णय देण्यात येईल, असे सांगितले. न्यायालय काय निर्णय देणार, याची उत्कंठा त्यांच्या कार्यकर्त्यांना लागून राहिली होती.
मोठ्या संख्येने उदयनराजेंचे कार्यकर्ते न्यायालयाच्या आवारात निर्णयाची प्रतीक्षा करीत होते. साडेपाचच्या सुमारास न्यायाधीशांनी निकाल जाहीर केला. एक दिवसाआड हजेरीची अट रद्द करून न्यायालयाने उदयनराजेंना लोणंद एमआयडीसी परिसरात न्यायालयाच्या परवानगीशिवाय जाण्यास मज्जाव केला. तसेच तपासासाठी पोलीस अधिकाºयांनी बोलाविल्यानंतर त्यांना सहकार्य करावे, साक्षीदारावर दबाव आणू नये, अशा प्रकारच्या नव्याने अटी उदयनराजेंना घालण्यात आल्या आहेत.
साताºयात
कडेकोट बंदोबस्त
उदयनराजेंच्या अंतरिम जामिनाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यस्था अबाधित राहावा, यासाठी पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.
राजवाडा, मोती चौक, कमानी हौद, पाचशे एक पाटी, बसस्थानक आणि न्यायालय परिसरात पोलिसांचा बंदोबस्त होता. शहरातून आत येणाºया प्रत्येक रस्त्यावर पोलिसांनी नाकाबंदी केली होती.
जिल्हा न्यायालय परिसरात उदयनराजे समर्थक जमले असले तरी गेल्या आठवड्यात जेवढी गर्दी उसळली होती तेवढी संख्या बुधवारी नसल्याने पोलीस खात्यावर ताण बºयाअंशी कमी झाला.