उदयनराजेंनी सन्मानासाठी भाजपात जावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2019 10:58 PM2019-03-04T22:58:50+5:302019-03-04T22:58:56+5:30

सातारा : जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे आमदार हे शरद पवार यांना उदयनराजेंबद्दल काहीही सांगून राजकीय वातावरण बिघडवत आहेत. त्यापेक्षा उदयनराजेंनी सन्मान ...

Udayan Rajen to go to BJP for honor | उदयनराजेंनी सन्मानासाठी भाजपात जावे

उदयनराजेंनी सन्मानासाठी भाजपात जावे

Next

सातारा : जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे आमदार हे शरद पवार यांना उदयनराजेंबद्दल काहीही सांगून राजकीय वातावरण बिघडवत आहेत. त्यापेक्षा उदयनराजेंनी सन्मान जपण्यासाठी भाजपमध्ये जाऊन सातारा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी घ्यावी, असे बहुतांशी समर्थकांनी गोपनीय बैठकीत स्पष्ट केले. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
साताऱ्यातील एका हॉटेलमध्ये खासदार उदयनराजे भोसले यांच्या समर्थकांची गोपनीय बैठक झाली. या बैठकीला जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रवी साळुंखे, शिक्षण समितीचे माजी सभापती सुनील काटकर, उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के, अ‍ॅड. दत्ता बनकर, सुनील सावंत, राजेंद्र यादव, जितेंद्र खानविलकर, विजय यादव, माजी नगराध्यक्षा रंजना रावत, विकास शिंदे, संदीप शिंदे, किशोर शिंदे, विजय नायकवडी, महेश गुरव, जयवंत पवार, संग्राम बर्गे यांच्यासह जिल्ह्यातील विविध ठिकाणचे कार्यकर्ते उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून खासदार उदयनराजे भोसले हे तिसऱ्यांदा सातारा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवू इच्छित आहेत; पण त्यांच्या मार्गावर राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील आमदारांकडूनच काटे टाकण्याचे काम सुरू आहे. तसेच आमदारांनी अनेकवेळा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडेही उदयनराजेंबद्दल अनेक तक्रारी केल्या आहेत. तर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या कार्यकर्त्यांनीही स्वतंत्र जाऊन पवार यांची भेट घेतली होती. तसेच साताºयात बैठक घेऊन लोकसभेला उदयनराजेंना मदत करण्याबाबत नाखुशी दाखविली होती. त्यावर शिवेंद्रसिंहराजेंनी कार्यकर्त्यांना विचारात घेऊन काय तो निर्णय घेऊ, असे स्पष्ट केले होते. त्यानंतर आता उदयनराजेंच्या कार्यकर्त्यांनीच साताºयात गोपनीय बैठक घेऊन आपली मते मांडली.
साताºयातील या बैठकीत बहुतांशी समर्थकांनी राष्ट्रवादीचे आमदार हे शरद पवारांकडे उदयनराजेंबद्दल तक्रारी करतात. शिवेंद्रसिंहराजेंचे कार्यकर्तेही विरोधासाठी बैठका घेतात. खुद्द शिवेंद्रसिंहराजे हेही ‘मिसळ’ खाऊन दबाव टाकतात. अशा गोष्टींमुळे उदयनराजेंनी भाजपमध्ये जावे. कारण, भाजप हा उदयनराजेंसाठी सुरक्षित पक्ष आहे. तेथील नेत्यांशीही त्यांचे चांगले संबंध आहेत. राष्ट्रवादीमध्ये अवमानकारकरीत्या थांबण्यापेक्षा भाजपमध्ये जाऊन उमेदवारी घ्यावी, असे स्पष्ट केले. तसेच उदयनराजे जो निर्णय घेतील तोही मान्य असेल, असेही या बैठकीत स्पष्ट केले. गोपनीय बैठकीतील कार्यकर्त्यांच्या या मतामुळे खरेच उदयनराजे भाजपमध्ये जाणार का? हा प्रश्न आहे. त्याचबरोबर कार्यकर्त्यांच्या या बैठकीमुळे खळबळ उडाली आहे.
विरोधकांना वेळ आल्यावर जागा दाखवू...
या बैठकीत जोरदार राजकीय खलबते झाली. राष्ट्रवादीत उदयनराजेंना सन्मानपूर्वक वागणूक मिळत नाही. यापाठीमागे विरोध करणारे अनेक आहेत. अशा विरोध करणाऱ्यांना त्यांची जागा वेळ आल्यानंतर दाखवून देऊ, असा स्पष्ट इशाराही यावेळी उदयनराजे समर्थकांनी दिला.

Web Title: Udayan Rajen to go to BJP for honor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.