उदयनराजेंच्या छावणीचा सर्वच बंडोबांना सहारा!
By admin | Published: January 30, 2017 11:27 PM2017-01-30T23:27:27+5:302017-01-30T23:27:27+5:30
घडामोडींना वेग : समविचारी लोकांना सोबत घेऊन आघाडीचे उमेदवार
सातारा : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा विकास आघाडीची घोषणा करणाऱ्या खासदार उदयनराजे भोसले यांनी सर्वच पक्षांतील बंडोबांना आपल्याकडे खेचण्याचा सपाटा लावला आहे. उदयनराजेंचे मुख्य टार्गेट सातारा व जावळी हे दोन तालुके आहेत. राष्ट्रवादीचे बहुतांश बंडखोर उदयनराजेंसोबत संधान साधून असल्याची खात्रीशीर माहिती पुढे येत आहे.
राष्ट्रवादीला शह देण्यासाठी काँगे्रस, भाजप, शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना हे पक्ष सरसावले आहेत. उदयनराजेंच्या विचारांची अनेक मंडळी भाजपच्या गोटात जाऊन विसावू लागली आहेत. सातारा व जावळी या दोन तालुक्यांवर उदयनराजेंच्या राजधानी सातारा विकास आघाडीचे विशेष लक्ष असल्याने विविध पक्षांतील आपल्या विचारांच्या लोकांना ते सातारा तालुक्यातूनही उमेदवारी देण्याची शक्यता आहे.
सातारा तालुक्यात पक्षीय राजकारणापेक्षा आघाड्यांचे राजकारण मोठ्या प्रमाणावर चालते. खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे दोन गट एकमेकांशी लढायला सज्ज झाले आहेत. आता जावळीतही उदयनराजेंनी लक्ष घातले असून, तिथूनही राष्ट्रवादीतील बंडखोर हेरून त्यांना उदयनराजेंकडून उमेदवारी दिली जाऊ शकते. उदयनराजेंनी काही दिवसांपूर्वी भाजपचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याशी चर्चा केली होती. शिवसेनेचे मंत्री विजय शिवतारे यांच्याशीही त्यांची बोलणी झाली होती. हे दोन्ही पक्ष आपल्या चिन्हांवर निवडणूक लढण्यासाठी आग्रही आहेत. त्यांच्या या आग्रहाचा आदर राखून जिल्ह्यात जागोजागी आघाडी करण्याची तयारी उदयनराजेंनी सुरू केली आहे. मात्र, या सर्वच हालचाली अत्यंत गोपनीयरीत्या सुरू आहेत. ‘भाजप व शिवसेना, रासप, स्वाभिमानी शेतकरी संघटना या पक्षांच्या नेत्यांनीही उदयनराजेंसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी काही दिवसांत उदयनराजे काय चमत्कार दाखवितात, हे बघाच!’ असा निर्धार उदयनराजेंचे निकटवर्तीय खासगीत व्यक्त करताना पाहायला मिळते.
अमित कदमांचेही ‘हम साथ साथ’
राष्ट्रवादीला रामराम करणारे माजी शिक्षण सभापती अमित कदम यांचा निर्णय अद्याप झालेला नाही. ते कोणत्या पक्षात जातील, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार असले तरी ते खासदार उदयनराजे भोसले यांच्यासोबतच राहणार आहेत, असा ठाम विश्वास त्यांचे निकटवर्तीय व्यक्तकरीत आहेत. उदयनराजेंनी सातारा तालुक्यावर प्रामुख्याने लक्ष केंद्रित केलेले आहे. जिल्ह्यात जे समविचारी लोक आहेत, त्यांना उमेदवारी देऊन निवडणूक लढली जाणार आहे.