राज्यात पुन्हा भाजपचे सरकार येण्यासाठी उदयनराजेंची मदत  : अमित शहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2019 01:23 PM2019-09-14T13:23:05+5:302019-09-14T13:29:02+5:30

फडणवीसांनी गेल्या पाच वर्षात केलेले काम आणि उदयनराजेंची साथ यामुळे आगामी विधानसभेत तीन चतुर्थांश बहुमत मिळेल, असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी व्यक्त केला.

Udayan Raje's help to get BJP government back in the state: Amit Shah | राज्यात पुन्हा भाजपचे सरकार येण्यासाठी उदयनराजेंची मदत  : अमित शहा

राज्यात पुन्हा भाजपचे सरकार येण्यासाठी उदयनराजेंची मदत  : अमित शहा

Next
ठळक मुद्दे विधानसभेला तीन चतुर्थांश बहुमत मिळण्याचा शहांना विश्वासमुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत पार पडला उदयनराजेंचा प्रवेश सोहळा

सातारा : छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वदेश आणि स्वधर्म वाचविण्यासाठी कठीण परिस्थितीत लढा दिला आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्यांचे वंशज उदयनराजे भोसले हे भाजपमध्ये येत आहेत. त्यांचा भाजपला विधानसभेसाठी चांगला फायदा होईल. फडणवीसांनी गेल्या पाच वर्षात केलेले काम आणि उदयनराजेंची साथ यामुळे आगामी विधानसभेत तीन चतुर्थांश बहुमत मिळेल, असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी व्यक्त केला.

उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारकीचा मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास राजीनामा देऊन सकाळी अमित शहा यांच्या निवासस्थानी भाजपप्रवेश केला. त्यावेळी शहा बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार रावसाहेब दानवे, जे. पी. नड्डा आदी उपस्थित होते.

शहा म्हणाले, उदयनराजे यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर भाजपमध्ये प्रवेश केला आहे. शिवछत्रपतींच्या विचारांची प्रेरणा घेऊन आम्ही काम करत आहोत. त्यांच्याच कुटुंबातील सदस्य भाजपमध्ये आल्यामुळे भाजपशी सर्वसामान्यांचीही नाळ जोडली जाईल. लोकसभेला आम्हाला चांगले यश मिळाले आहे, त्यापेक्षाही चांगले यश विधानसभेला मिळेल.

देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या पाच वर्षात खूप चांगले काम करून राज्याला गतवैभव मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे २०१४ पेक्षा २०१९ मध्ये आम्हाला चांगले यश मिळेल. त्यामध्ये उदयनराजेंचीही मदत होईल.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, उदयनराजेंच्या प्रवेशामुळे केवळ भाजपलाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला आनंद झाला आहे. शिवरायांनी स्वराज्याचे बीजारोपण केले आणि त्याचा वटवृक्ष करण्याचे काम केले. त्यांचेच काम पुढे चालवत जनसामान्यांपर्यंत घेऊन जाण्याचे काम उदयनराजे करत आहेत. ते राजे असले तरी जनतेशी नाळ तुटलेली नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मिरसंदर्भात घेतलेल्या ३७० कलमाचा निर्णय त्यांना अधिक भावला आहे. प्रथम देश ही त्यांची कायम भूमिका राहिली आहे. तसेच साताऱ्याचाही विकास समोर ठेवूनच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

ते पुढे म्हणाले, अगोदर कोल्हापूरचे संभाजीराजे नंतर समरजित घाडगे, शिवेंद्र्रसिंहराजे आणि आता उदयनराजे भोसले भाजपमध्ये आले आहेत. त्यामुळे भाजपला लोकाभिमुख कामे करणे सोपे होईल. ते तीन महिन्यापूर्वी निवडून आले आहेत.

आता पुन्हा नव्याने निवडणूक होईल आणि ते मोठ्या मताधिक्याने निवडून येतील. त्यांच्या क्षमतेचा, नेतृत्वाचा तरुणाईला एकत्र करण्यासाठी भाजपला फायदा होईल आणि युवाशक्ती मुख्य प्रवाहात आणण्याचे काम करता येईल.

पक्षप्रवेशानंतर उदयनराजे म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळात विकासकामे होत आहेत. त्यांनी कधीही पक्षीय राजकारण केले नाही. ज्या ठिकाणी विकासाची गरज आहे, तिथे मदत करत राहिले. प्रत्येक तालुक्यातील विकासासाठी त्यांनी प्रयत्न केले आहेत. याउलट आघाडी सरकारच्या काळात सत्तेवर असतानाही १५ वर्षात फाईल पुढे जातच नव्हती. मात्र, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून कसलाही विलंब न लागता कामे मार्गी लागत आहेत.

सत्तेत असताना जी कामे झाली नाहीत. स्वकीयांशीच संघर्ष करावा लागला. ती कामे विरोधात असताना झाली. त्यामुळे सध्या जी वेळ आली आहे त्यापूर्वी आत्मपरिक्षण आणि आत्मचिंतन केले असते तर आत्मक्लेश करण्याची वेळ आली नसती. आम्ही कोणाबद्दल वाईट बोलत नाही पण हे कर्माचे भोग आहेत त्यामुळे जनतेला विश्वासात घेऊन भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

माझे नाव उदयनराजे...जे करतो ते सांगून करतो

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना आपण भेटला काय चर्चा झाली. याबाबत विचारले असता उदयनराजे म्हणाले, माझे नाव काय आहे, माहित आहे ना...उदयनराजे....मी जे करतो ते सर्वांना सांगून करतो. लपून-छपून करत नाही. त्यामुळे त्यांना सांगूनच बाहेर पडलो.

लोकसभा निवडणुकीत मला जेवढे अपेक्षित मताधिक्य अपेक्षित होते तेवढे मिळाले नाही. त्यामुळे तो मी नैतिक पराभवच समजतो. म्हणूनच गुलाल अंगाला लावून घेतला नाही. उमेदवारी द्यायची आणि पुन्हा आडवाआडवी करायची. असेच अडवा आणि जिरवाचे राजकारण होत राहिले.

ईव्हीएम दोषाचा तांत्रिक पुरावा मिळाला नाही

लोकसभा निवडणुकीच्या अगोदर आणि नंतरही उदयनराजे यांनी ईव्हीएम मशीनचा मुद्दा उपस्थित केला होता. मात्र, ईव्हीएमची तपासणी केल्यानंतर त्याबाबत तांत्रिकदृष्ट्या पुरावा मिळू शकला नाही. लोकांनी कामाच्या बाजूने कौल दिला आहे, हे देखील लक्षात आले, त्यामुळे ईव्हीएमचा मुद्दा गौण झाला आहे.

Web Title: Udayan Raje's help to get BJP government back in the state: Amit Shah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.