उदयनराजेंचे साडेचारशे रुपये प्रशासनाने केले परत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:38 AM2021-04-18T04:38:55+5:302021-04-18T04:38:55+5:30
सातारा : उदयनराजे यांनी दिलेली साडेचारशे रुपयांची रोख रक्कम कायदेशीररीत्या स्वीकारता येत नसल्याचे पत्र देत जिल्हा प्रशासनाच्या वतीने ...
सातारा : उदयनराजे यांनी दिलेली साडेचारशे रुपयांची रोख रक्कम कायदेशीररीत्या स्वीकारता येत नसल्याचे पत्र देत जिल्हा प्रशासनाच्या वतीने त्यांच्या निवासस्थानी जाऊन ही रक्कम परत देण्यात आली आहे.
याबाबत हकीकत अशी, शासनाच्या वतीने संपूर्ण राज्यात वीकेंड लॉकडाऊन घोषित केला होता, त्यात सुधारणा करत जिल्हा प्रशासनाने अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. जिल्हा प्रशासनाने काढलेल्या आदेशाला विरोध करत खासदार उदयनराजे भोसले यांनी शनिवार, दि. १० एप्रिल रोजी साताऱ्यामध्ये भीक मांगो आंदोलन केले होते.
या आंदोलनावेळी उदयनराजेंनी सरकारसह जिल्हा प्रशासनावर सडकून टीका केली होती. एका आंब्याच्या खाली बसून उदयनराजेंनी भीक मांगो आंदोलन केले. थाळीमध्ये साडेचारशे रुपये जमा झाले होते. ही रक्कम उदयनराजेंनी जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन प्रशासनाकडे दिली होती. तसेच लॉकडाऊन मागे घ्यावाच लागेल, अन्यथा असंतोष भडकेल, असा इशारा जिल्हा प्रशासनाला दिला होता.
त्यानंतरही राज्य शासनाने संपूर्ण राज्यात कडक लॉकडाऊन सुरू केले. १४ एप्रिलपासून १ मेपर्यंत हे लॉकडाऊन आहे. त्यानंतरदेखील हे पुढे चालू राहण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, उदयनराजे यांनी दिलेली रक्कम ही कायदेशीररीत्या स्वीकारता येत नसल्याचे एका ओळीचे पत्र लिहून जिल्हाधिकाऱ्यांनी उदयनराजेंनी दिलेली रोकड एका पाकिटात घालून तिच्यासोबत ते पत्र जोडून उदयनराजेंच्या जलमंदिर येथील कार्यालयात जमा केले आणि कार्यालयाची पोचदेखील घेतल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.
कोट
जिल्हा प्रशासनाला आंदोलनातील रोख रक्कम स्वीकारता येत नाही. तशी कोणतीही कायदेशीर तरतूद नसल्याने ती रक्कम आंदोलकांना परत करण्यात आली आहे.
- सुनील थोरवे,
निवासी उपजिल्हाधिकारी, सातारा