‘साविआ’तल्या वादावर उदयनराजेंकडून पडदा!
By admin | Published: September 2, 2014 11:45 PM2014-09-02T23:45:17+5:302014-09-02T23:45:17+5:30
नाराजीनामा : इशाऱ्यानंतर काढली उपनगराध्यक्षांची समजूत
सातारा : फिश मार्केटच्या भूमिपूजनाचा निरोपच न मिळालेल्या उपनगराध्यक्षा दिनाज शेख यांनी सोमवारी राजीनामा देण्याचा इशारा दिला होता. सातारा विकास आघाडीमधील माजी नगराध्यक्षा या पालिकेच्या पदाधिकारी असल्यासारखे वागत असल्याने अधिकार नसताना पदावर राहण्यात अर्थ नाही, असे म्हणत शेख यांनी हा इशारा दिला. मात्र, खासदार उदयनराजे भोसले यांनी मंगळवारी पालिकेत हजर होऊन आघाडीतील वादावर पडदा टाकला.
सोमवारी फिश मार्केटचे उद्घाटन झाले. या कार्यक्रमाला उपनगराध्यक्षा दिनाज शेख यांना निमंत्रणच दिले नाही, असा त्यांचा आरोप आहे. माजी नगराध्यक्षा सुजाता राजेमहाडिक व स्मिता घोडके या दोघीच आघाडीतील निर्णय घेतात. त्यामुळे राजीनामा देण्याचा इशारा शेख यांनी दिला होता. फिश मार्केटच्या उद्घाटनालाही त्या नव्हत्या. दरम्यान, मंगळवारी सकाळी खासदार उदयनराजे भोसले पालिकेत दाखल झाले. त्यांनी उपनगराध्यक्षा दिनाज शेख यांच्याशी बातचीत केली.
‘कुठलाही कार्यक्रम परस्पर ठरविला जातो, मला त्याबाबत सांगितलेही जात नाही,’ अशी तक्रार दिनाज शेख यांनी त्यांच्याकडे केली. त्यावर उदयनराजेंनी लेखापाल हेमंत जाधव यांना बोलावून घेतले. ‘पालिकेत जे निर्णय होतील ते नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व दोन्ही आघाड्यांच्या पक्षप्रतोदांना विचारात घेऊनच घेतले जावेत,’ अशी सूचना त्यांनी केली. ज्याचा मान त्याला मिळालाच पाहिजे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. तब्बल अर्धा तास त्यांची ही चर्चा सुरु होती. (प्रतिनिधी)